झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक याचं वयाच्या ४९ व्या वर्षी कर्करोगानं निधन झाल्याचं वृत्त आज सकाळी पसरलं होतं. त्यामुळे क्रिकेट जगतामध्ये शोकाचं वातवरण होतं. मात्र आता हिथ स्ट्रिकचा झिम्बाब्वेच्या संघातील सहकारी हेन्री ओलोंगा याने हिथ स्ट्रिकच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याची माहिती दिली आहे. तसेच स्वत: हिथ स्ट्रिकनेच आपण जिवंत असल्याचे आपल्याचा मेसेज करून सांगितल्याचा दावा हेन्री ओलोंगाने केला आहे.
दरम्यान, हिथ स्ट्रिकचं निधन झाल्याचं दु:खद वृत्त हेन्री ओलोंगा याने ट्विट करून दिलं होतं. हिथ स्ट्रिकचं निधन झाल्याची दु:खद बातमी आली आहे. झिम्बाब्वेच्या या महान क्रिकेटपटूच्या आत्म्याला शांती मिळो. तुमच्यासोबत खेळणं माझ्यासाठी सन्मानजनक बाब होती. मात्र आता हेन्री ओलोंगाने आपलं जुनं ट्विट डिलीट करून हिथ स्ट्रिक जिवंत असल्याचा दावा केला आहे. ओलोंगाने आपल्या नव्या ट्विटमध्ये लिलिहं आहे की, हिथ स्ट्रिकच्या निधनाची बातमी खूप वेगाने पसरली. मी आताच त्याच्याशी बोललो. तिसऱ्या पंचांनी त्याला परत बोलावलंय. तो खूप मनमोकळा माणूस आहे आणि तो जिवंत आहे.
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार असलेल्या हिथ स्ट्रिकने बोर्डासोबत वाद झाल्यामुळे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. स्ट्रिकने झिम्बाब्वेकडून ६५ कसोटी आणि १८९ सामने खेळले होते. या दोन्ही प्रकारात मिळून त्याने ४९३३ धावा आणि ४५५ बळी टिपले आहेत.
२००५ मध्ये हिथ स्ट्रिकने प्रशिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याने बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. तसेच आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम हापिलं होतं. दरम्यान, २०२३ मध्ये हिथ स्ट्रिकच्या कुटुंबीयांनी त्याला कर्करोग झाला असून, त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती.