Join us  

Deepti Sharma : दीप्ती शर्मा खोटारडी! 'मंकडिंग' वादावर इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचा भारतीय खेळाडूवर आरोप

India Womens vs England Womens : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये ऐतिहासिक वन डे मालिका जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 5:52 PM

Open in App
ठळक मुद्देcr

India Womens vs England Womens : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये ऐतिहासिक वन डे मालिका जिंकली. झुलन गोस्वामीच्या अखेरच्या मालिकेत भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करताना मलिका ३-० अशी जिंकली. पण इंग्लंडला हा पराभव जिव्हारी लागला आणि त्यांच्याकडून भारतीय खेळाडू दीप्ती शर्मा ( Deepti Sharma) हिच्यावर टीका होताना दिसतेय.. त्यात इंग्लंडची कर्णधार हिदर नाइट ( England skipper Heather Knight) हिने भारतीय खेळाडूला खोटारडी म्हटले आहे.  तिसऱ्या वन डे सामन्यात दीप्तीने मंकडिंग करताना इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला रन आऊट केले आणि भारताला विजय मिळवून दिला. तिच्यावर टीका झाली. ICC नेही ती विकेट नियमात बसत असल्याचे स्पष्ट केले आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असणाऱ्या फलंदाजांना क्रिजमध्ये राहण्याचा सल्ला दिला.

होत असलेल्या टीकेवर दीप्तीने अखेर मायदेशात परतल्यानंतर उत्तर दिले. इंग्लंडच्या फलंदाजाला  आम्ही ताकिद दिली होती आणि अम्पायरलाही याबाबत सांगितले होते, असा दावा दीप्तीने केला. ती म्हणाली. ''वारंवार ताकिद दिल्यानंतरही ती ऐकली नाही आणि त्यामुळे आम्ही तिला ठरवून बाद केले. आम्ही नियमानुसारच ती विकेट मिळवली. आम्ही अम्पायरलाही याबबात सांगितले होते, परंतु ती चेंडू टाकण्याआधीच क्रिज सोडत होती,''असे दीप्ती म्हणाली. 

पण, दीप्तीचा हा दावा इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटने खोडून काढला आणि भारतीय खेळाडू खोटं बोलत असल्याचे ती म्हणाली. ''भारतीय संघ विजयाचा हकदार आहे, परंतु त्यांच्याकडून तशी कोणतीच ताकिद दिली गेली नव्हती. त्यांना देण्याची गरज नाही, त्यामुळे ती विकेट कायदेशीर होत नाही. पण, जर त्यांना हा रन आऊट नियमानुसार केल्याचे वाटत असेल तर त्यावर आम्ही वॉर्निंग दिली होती, असं खोटं स्पष्टिकरण देण्याची गरज नाही.'' 

दीप्ती शर्माने कसे बाद केले ?१६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ९ फलंदाज ११८ धावांत माघारी परतले होते. त्यानंतर चार्लोट डीन हिने अखेरच्या सहकाऱ्यासह ३५ धावा जोडत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. दीप्ती शर्मा हिने ४४ व्य षटकात डीन हिला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले आणि इंग्लंडच्या झुंजीवर पाणी फिरवले. ४४ व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी दीप्ती शर्मा हिने बॉलिंग मार्कवरून धावण्यास सुरुवात केली असतानाच यष्ट्यांजवळ आल्यावर नॉन स्ट्राईकवर असलेली डीन ही लाईनच्या बाहेर असल्याचे दीप्तीला दिसले आणि तिने संधी साधून मागे वळत बेल्स उडवून डीनला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले.  नव्या बदलानुसार अशा पद्धतीने बाद करण्यास आयसीसीने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे डीन बाद ठरली.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App