दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen ) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ३२ वर्षीय खेळाडूने आफ्रिकेसाठी चार कसोटी सामने खेळले होते, त्यातील शेवटचा सामना गेल्या वर्षी मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना त्याने ८५ सामन्यांत ४६.०९ची सरासरी ठेवली होती. त्याने २०१९ मध्ये भारताच्या दौऱ्यावर रांचीमध्ये पहिली कसोटी मॅच खेळली. त्यानंतर सिडनी, सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे कसोटी खेळण्यासाठी त्याला चार वर्ष वाट पाहावी लागली. ४ कसोटी सामन्यांत ३५ या सर्वोत्तम खेळीसह तो फक्त १०४ धावा करू शकला आणि त्यानंतर काइल वेरेनने त्याच्या जागी संघात प्रवेश मिळवला. क्लासेन आता त्याचे लक्ष पूर्णपणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे वळवेल आहे. त्याने २०२३ मध्ये ट्वेंटी-२०त १७२.७१ आणि वन डे क्रिकेटमध्ये १४०.६६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
"माझी बॅगी टेस्ट कॅप ही मला मिळालेली सर्वात मौल्यवान कॅप आहे. माझ्या रेड-बॉल कारकीर्दीत ज्यांनी भूमिका बजावली आणि मी आज आहे त्या क्रिकेटरमध्ये मला आकार दिला त्या सर्वांचे आभार. पण सध्या एक नवीन आव्हान आहे आणि मी आहे. त्याची वाट पाहत आहे,'' असेही तो म्हणाला.