जोहनसबर्ग - मालिकेत आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. चौथ्या वन-डेत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरलेल्या खेळाडूनं भारताच्या पराभावचं कारण सांगितले आहे. त्याचबरोबर चौथ्या वन-डेत विराट कोहलीनं घेतलेल्या निर्णयावरही त्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या या लढतीत भारताच्या फलंदाजांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली होती. त्यानंतर गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेला अडचणीत आणले होते. पण अखेरच्या काही षटकांमध्ये सामन्याला कलाटनी मिळाली.
दक्षिण आफिकेच्या विजयात मोलाचे योगदान दिलेल्या हेन्रिक क्लासेन याला, कर्णधार विराट कोहलीच्या एका निर्णयाचे आश्चर्य वाटले. डेथ ओव्हर्सच्या निर्णायक क्षणांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या कसलेल्या वेगवान गोलंदाजांना डावलून, फिरकीपटूंना गोलंदाजी देण्यात आलेल्या निर्णयाने तो चकित झाला.फिरकीपटूंनी अंतिम क्षणी धावांची खैरात केल्याचा भारताला मोठा फटका बसला. क्लासेन म्हणाला की, पावसामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडू वळविण्यात खूप अडचणी येत होत्या. त्यामुळं अंतिम क्षणांमध्ये फिरकी गोलंदाजांकडे चेंडू देण्यात आल्याचे मला आश्चर्य वाटले. डेव्हिड मिलर आणि मला वाटलं की, अखेरच्या चार षटकांसाठी वेगवान गोलंदाजांना राखून ठेवले आहे. मात्र, माझ्या मते आतापर्यंतच्या कामगिरीनुसार फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली असेल, पण हा निर्णय माझ्यासाठी अनपेक्षित होता.’
सहा वन-डे मालिकेमध्ये भारत 3-1 ने आघाडीवर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा वन-डे सामना उद्या रंगणार आहे.
शिखर धवन काय म्हणाला - झेल सोडणे आणि ‘नो बॉल’मुळे मिल्लरसारखा महत्त्वाचा बळी न मिळणे हे पराभवाचे मुख्य कारण ठरले. यानंतर, सगळी लय बिघडली. याशिवाय संपूर्ण सामन्यात आम्ही चांगल्या स्थितीमध्ये होतो. पावसामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडू वळविण्यात खूप अडचणी आल्या. डेव्हिड मिल्लर खूप चांगला खेळला. त्याला नशिबाचीही साथ मिळाली. पहिले त्याचा झेल सुटला आणि त्यानंतर तो नो बॉलवर बाद झाला. साधारणपणे फिरकी गोलंदाज नो बॉल टाकत नाही. डेव्हिड मिल्लरने या जीवदानाचा पूर्ण फायदा उचलला आणि सामन्याचे चित्रच पालटले.
विराट काय म्हणाला -
भारताचा कर्णधार विराट कोहली याने यजमानांना त्यांच्या विजयाचे श्रेय देताना म्हटले की, ‘दक्षिण आफ्रिकेने चौथ्या सामन्यात चांगली जिद्द दाखविली. या विजयावर त्यांचा हक्कच होता. द. आफ्रिकेच्या सांघिक खेळाचे कौतुक करताना कोहलीने सांगितले की, ‘तुम्हाला दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल. माझ्या मते त्यांनी जबरदस्त जिद्द दाखविली, त्यांनी खूप चांगला खेळ केला आणि या विजयावर त्यांचा हक्कच होता. त्यांचा संघ चांगला असून, आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या क्रिकेटची अपेक्षा होती आणि त्यांनी चांगला खेळही केला. आम्हाला माहीत होते की, आणखी एक विजय मिळविण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल आणि यासाठी आम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल.