वेलिंग्टन - ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादव याने जबरदस्त खेळ करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपलं असलं तरी संपूर्ण स्पर्धेत सूर्याने केलेल्या ३६० डिग्री फटकेबाजीची चर्चा अद्यापही सुरू आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर सूर्यकुमार यादव भारतीय संघासोबत न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, वेलिंग्टनमध्ये पोहोचल्यानंतर सूर्यकुमार यादवने केलेल्या एका ट्विटला ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने दिलेल्या उत्तरामुळे फॅन्समध्ये गमतीदार चर्चा रंगली आहे.
त्याचं झालं असं की, न्यूझीलंडमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळण्यासाठी भारतीय संघ वेलिंग्टन येथे पोहोचला आहे. तिथे पोहोचल्यावर सूर्यकुमार यादवने ‘’हॅलो वेलिंग्टन’’ असं ट्विट केलं. ते ट्विट पाहून ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू अमांडा वेलिंग्टन हिला गंमत सुचली. तिने सूर्यकुमार यादवच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना हॅलो यादव, असा रिप्लाय दिला.
योगायोगाने अमांडाचं वेलिंग्टन हे आडनाव या विनोदाला कारणीभूत ठरले. या रिप्लायखाली तिने हसणारी इमोजीही शेअर केली आहे. त्यामुळे तिने गमतीजमतीमध्ये हा रिप्लाय दिल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान, अमांडाच्या रिप्लायनंतर तिचं आणि सूर्यकुमार यादवचं ट्वीट खूप व्हायरल होऊ लागलं. तसेच त्यावरून फॅन्सनीही मजा घेतली. एका युझरने लिहिलं की, यांचं वेगळ्याच लेव्हलवरचं फ्लर्ट चालू आहे. तर आणखी एकाने हेरा फेरीचं मीम शेअर करून लिहिलं की, कायको छेडता है रे बाबा पराई औरत को.
टी-२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता सूर्यकुमार यादव न्यूझीलंड दौऱ्यामध्ये कशी कामगिरी करतो याकडे फॅन्सचे लक्ष लागलेले आहे.