कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकार, आरोग्य यंत्रणा, सफाई कर्मचारी, पोलीस यांच्यासह सर्वच जण अहोरात्र मेहनत घेत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही मदतीचा हात पुढे करताना आपापल्या सरकारला आर्थिक मदत करत आहेत. आता यात दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षेल गिब्सचाही समावेश झाला आहे.
Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार
14 वर्षांपूर्वी जोहान्सबर्गवर गिब्सचे वादळ घोंगावले होते आणि त्यात रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियनं संघाचा पालापाचोळा झाला होता. वन डे क्रिकेटमध्ये 434 धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो, याचा विचारही कुणी केला नव्हता. ती अशक्यप्राय गोष्ट आफ्रिकन संघानं करून दाखवली होती आणि गिब्स हा त्याचा नायक ठरला होता. या ऐतिहासिक सामन्यातील बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय गिब्सनं घेतला आहे. लिलावातून उभा राहणारा निधी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी दान केला जाणार आहे.
जोहान्सबर्गवर 2006मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 बाद 434 धावा केल्या होत्या. कर्णधार पाँटिंगनं 164 धावांची वादळी खेळी साकारताना 13 चौकार व 9 षटकार खेचले होते. अॅडम गिलख्रिस्ट ( 55), सायमन कॅटिच ( 79) आणि माईक हसी ( 81) यांनी तुफान फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असेच सर्वांना वाटले होते, परंतु चमत्कार घडल्यासारखा आफ्रिकन संघ जिंकला. कर्णधार ग्रॅमी स्मिथ ( 90) आणि हर्षेल गिब्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 187 धावांची भागीदारी करून आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला.
गिब्सनं 111 चेंडूंत 21 चौकार व 7 षटकार खेचून 175 धावा चोपल्या. त्यानं मार्क बाऊचरने ( 50) चांगली साथ दिली आणि आफ्रिकेनं एक विकेट व एक चेंडू राखून हा सामना जिंकला. त्या ऐतिहासिक सामन्यातील बॅटचा लिलाव करणार असल्याचे गिब्सने शुक्रवारी जाहीर केले.