हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून चाहत्यांच्या रोषाचा सामना करतोय... गेली १० वर्ष रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळून सर्वाधिक पाच आयपीएल जेतेपदं मुंबई इंडियन्सी जिंकली आहेत. त्यामुळे रोहितशिवाय या फ्रँचायझीच्या कर्णधारपदी दुसरं कुणीतरी त्यात हार्दिक पांड्या, हे पचनी पडणे अवघडच आहे. पण, हार्दिकच्या नेतृत्वात MI ला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सहापैकी २ सामने जिंकता आलेले आहेत. काल वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्सकडून त्यांना २० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर होणाऱ्या टीकेपासून हार्दिकचा बचाव करण्यासाठी संघाचा फलंदाज कोच किरॉन पोलार्ड मैदानावर उतरला.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलार्डने हार्दिकचा बचाव केलायच शिवाय त्याच्यातल्या आत्मविश्वासाची पत्रकारांना जाणीव करून दिली. ''तो एक आत्मविश्वासू माणूस आहे. तो संघाभोवती उत्कृष्ट आहे. क्रिकेटमध्ये तुमचे चांगले आणि वाईट दिवस येत राहतात आणि मी पाहतोय की तो त्याच्या कौशल्यावर आणि त्याचा वापर मैदानावर करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला अशाही दिवसांना सामोरे जावे लागते. क्रिकेट हाही एक खेळच आहे. सहा आठवड्यानंतर तो देशाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला दिसणार आहे. आपण सर्व त्याच्यासाठी चिअऱ करू आणि त्याने चांगले खेळावे अशी इच्छा व्यक्त करू. त्यामुळे त्याला प्रोत्साहन द्या आणि टीका करणे थांबवा, ” असे पोलार्ड म्हणाला.
“आणि, आपल्या आजूबाजूच्या महान खेळाडूंमधून आपण सर्वोत्तम मिळवू शकतो का, ते पाहा. तो फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करू शकतो आणि त्याच्याकडे एक्स-फॅक्टर आहे. तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माझ्या अंतःकरणात खोलवर आशा आहे की, जेव्हा तो फॉर्मात येईल, तेव्हा मी मागे बसेन आणि मी प्रत्येकजण त्याचे गुणगान गाताना पाहिन,''असा विश्वासही पोलार्डने व्यक्त केला.
भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण ( Irfan Pathan ) याने तर हार्दिकवर जोरदार टीका केली आहे. एमआयने हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर नाराज झालेल्या चाहत्यांकडून त्याच्यावर टीका होताना दिसतेय. आता तर त्याने चाहत्यांना आणखी संधी दिली आहे. इरफानने हार्दिकवर उघडपणे टीका केली होती, ज्याने गुजरात टायटन्सचा माजी कर्णधाराला MI ची जबाबदारी देण्याच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.