भारताचे माजी गोलंदाज मदन लाल यांनी विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. ही मस्करी सुरू आहे का?, असा सवाल करताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयनं वन डे कर्णधारपदावरून हटवल्यामुळे विराट नाराज असल्याचेही ते म्हणाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्याच्या २४ तासानंतर विराटनं हा धक्का देणारा निर्णय घेतला. ३३ वर्षीय विराट आता भारताच्या कोणत्याच संघाचा कर्णधार नाह. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यानं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये बीसीसीआयनं त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून काढले. त्यानंतर विराट व बीसीसीआय यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया या परस्पर विरोधी असल्यानं मोठा वाद निर्माण झाला. विराट आणि बीसीसीआय यांच्यात सारं काही ठिक नसल्याचे यावरून स्पष्ट झाले.
विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे. दरम्यान, आपण हा निर्णय का घेतला, याबाबत विराटनं त्याच्या निवेदनात काहीच उल्लेख न केल्यानं संभ्रम अजून वाढला आहे. India Today शी बोलताना मदन लाल यांनी विराट कोहली अजूनही बीसीसीआयनं वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले म्हणून नाराज आहे आणि त्यामुळेच त्यानं हा निर्णय घेतला, असा दावा केला.
ते म्हणाले,''कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून विराट कोहलीनं मला आश्चर्याचा धक्का दिला. निवड समिती किंवा बोर्ड यांनी वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यामुळे तो अजूनही नाराज आहे. त्यांनी वन डे संघाचं नेतृत्व का काढून घेतलं?; हा प्रश्न त्याच्या डोक्यात अजूनही घर करून आहे. त्यानं अजून दीर्घकाळ कसोटी संघाची जबाबदारी पार पाडायला हवी होती. त्यानं कसोटीत मोठं यश मिळवलं आहे.''
विराट कोहलीनं कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक ६८ सामन्यांत ४० विजयांची नोंद केली आहे. भारताचा तो सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. मदन लाल पुढे म्हणाले,''दौरा सुरू असताना असं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेणे, ही मस्करी सुरू आहे का?; ट्विट करून ही माहिती देणे, ही तर मस्करीच आहे. तुला कर्णधारपद नाही भूषवायचे, तर तू बीसीसीआय अध्यक्ष किंवा निवड समितीला पत्र लिहून तसं कळवायला हवं होतं.''