कॉफी विथ करण ( Koffee With Karan) मालिकेतील वादग्रस्त विधान हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांची पाठ काही केल्या सोडण्याचं नाव घेत नाही. महिलांचे अपमान करणाऱ्या विधानामुळे पांड्या व राहुल या दोघांनाही काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघारी बोलावण्यात आले होते, तर BCCIनं आर्थिक दंडही सुनावला होता. त्यानंतर हे प्रकरण संपेल असे वाटत होते, परंतु आता एक नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणाचा तपासावर बंदी घालण्यात आली होती, परंतु जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयानं ही बंदी हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
पांड्या आणि राहुल यांच्या वतीने दाखल केलेल्या एकल खंडपीठाच्या विविध फौजदारी याचिकेवर सुनावणी करताना तपास अधिकाऱ्यांसमोर कायदेशीर प्रतिनिधी किंवा कायदेशीर सल्लागार यांच्यामार्फत आपली बाजू मांडण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. डी.आर. मेघवाल यांनी २०१९ मध्ये याच प्रकरणात पांड्या आणि राहुलविरोधात लूणी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एफआयआर रद्द करण्यासाठी दोन्ही खेळाडूंच्या वतीने विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हायकोर्टाने अटकेला स्थगिती दिली तसंच तपासही थांबवला होता.
न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी पूर्वीच्या स्थगिती आदेशात बदल करताना तपासावर आणलेली बंदी हटवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पण, या दोन्ही खेळाडूंविरूद्ध कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. तक्रारदाराच्या वतीने बाजू मांडताना वकील अनिल बिदान हालू आणि महिपालसिंग चरण म्हणाले की, ''दोन वर्षांपासून या खटल्याची चौकशी झालेली नाही. याचिकाकर्ते तपास अधिकार्यांना सहकार्य देखील करत नाहीत. अशा परिस्थितीत तपासावर परिणाम होत आहे.''
कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय? करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''कुटुंबीयही किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडूहार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.