मुंबई : बहुप्रतीक्षित मुंबई ट्वेन्टी-20 लीगच्या लिलावाला सुरुवात झाली आणि काही वेळातच चाहत्यांना जोरदार धक्का बसला. श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेन्टी-20 तिरंगी मालिकेसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मापेक्षा मुंबईच्या रणजी संघातील सूर्यकुमार यादवला जास्त भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवला मुंबई नॅार्थ ईस्ट संघाने सात लाख रुपये मोजत आपल्या संघात सामील करून घेतले आहे. पण रोहितला आपल्या संघात सामील करून घेताना नॅार्थ वेस्ट संघाने सहा लाख रुपये मोजले आहेत. भारतीय संघातील अजिंक्य रहाणेला सात रुपये देत मुंबई नॅार्थ संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
सूर्यकुमारला हा या लिलावाचा नायक ठरल्याचे चित्र समोर येत आहे. कारण सूर्यकुमारची लिलावासाठी चार लाख रुपये एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती. त्यावेळी तीन संघांना तो आपल्या ताफ्यात हवा होता. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी तिन्ही संघांनी जोर लावला होता आणि त्याचाच फायदा सूर्यकुमारला झाला. अखेर सात लाख रुपये मोजत मुंबई नॅार्थ ईस्टने सूर्यकुमारला संघात स्थान दिले.रोहितची या लिलावासाठी चार लाख रुपये मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण त्याला सूर्यकुमारएवढा चांगला भाव मिळू शकला नाही. अजिंक्यच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा त्याला संघात घेण्यासाठीही चांगली चढाओढ पाहायला मिळाली. कारण अजिंक्य हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे आणि तो जास्त काळ या लीगसाठी देऊ शकणार आहे. त्यामुळे या लिलावात अजिंक्यला चांगली मागणी मिळाल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्यची लिलावासाठी चार लाख ही मूळ किंमत ठेवली होती, त्यावरून त्याला सात लाख रुपये मोजत मुंबई नॅार्थने संघात सहभागी करून घेतले.भारताच्या संघात असलेल्या श्रेयस अय्यरलाही या लिलावात जास्त मागणी नसल्याचे दिसून आले. कारण श्रेयससाठी लाख रुपये ही मूळ किंमत ठरवण्यात आली होती. त्यापेक्षा एक लाख रुपये जास्त मोजत मुंबई नॅार्थ सेंट्रलने त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.युवा (19-वर्षांखालील) विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारा आणि देशाला जेतेपद जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पृथ्वी शॅा याला या हंगामात हवा तसा प्रितसाद मिळाला नसल्याचे दिसले. कारण पृथ्वीची दीड लाख एवढी मूळ किंमत ठेवली होती, पण मुंबई नॅार्थ संघाने दोन लाख 80 हजार रुपये मोजत पृथ्वीला संघात सामील करून घेतले.यंदाच्या हंगामात सिद्धेश लाडने दमदार कमगिरी केली होती, त्यामुळे त्याच्यासाठी कोणता संघ किती बोली लावून लावणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण त्याच्या नावाला जास्त मागणी असल्याचे लिलावात दिसून आले नाही. सिद्धेशसाठी चार लाख रुपये एवढी मूळ किंमत ठेवण्यात आली होती आणि त्याच किंमतीला मुंबई साऊथ सेंट्रल संघाने त्याला आपल्या ताफ्यात स्थान दिले आहे. मुंबईचा अनुभवी खेळाडू अभिषेक नायरचीही चार लाख रुपये, या मूळ किंमतीवरच बोळवण करण्यात आली. नायरला मुंबई साऊथने आपल्या संघात सामील करून घेतले.