मुंबई : आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील प्रमुख खेळाडू आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा याच्या खांद्याला खांदा लावून सलामीला खेळताना पाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या वन डे संघातील रोहित व शिखर धवन ही जोडी मुंबई इंडियन्सकडून धावांचा पाऊस पाडताना दिसणार आहे.
हैदराबाद संघाने मॅच फी कमी केल्यामुळे धवन नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याला घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्यातील हा करार यशस्वी ठरल्यास धवन पुढील हंगामात रोहितसह मुंबईच्या सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, धवनने हैदराबाद संघ सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान पुढील तीन वर्षांसाठी धवनचा हैदराबाद संघासोबत करार आहे, परंतु तो मोडला जाऊ शकतो. धवनने याबाबत प्रशिक्षक टॉम मूडी आणि भारतीय संघातील चार खेळाडूंशी चर्चा केली आहे. विराट कोहली ( 17 कोटी), रोहित शर्मा ( 15 कोटी) आणि महेंद्रसिंग धोनी ( 15 कोटी) यांना मोठी रक्कम मिळत असताना धवनला केवळ 5.2 कोटी रुपयेच मिळाले. त्यामुळे धवन नाराज आहे. हैदराबादने दुसरीकडे डेव्हीड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांना अनुक्रमे 12 व 8.5 कोटींमध्ये कायम राखले.