जवळपास दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज देणारा हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा ( Siddharth Sharma ) याचे गुरुवारी गुजरातमधील बडोदा येथे निधन झाले. रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सिद्धार्थ हिमाचल प्रदेश संघाचा सदस्य होता. पंजाबमधील नांगल जिल्ह्यातील भाभोर साहेब गुरुद्वारामध्ये शुक्रवारी सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
हिमाचल प्रदेशातील उना येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय सिद्धार्थ ३० डिसेंबरपर्यंत उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये उत्तराखंड संघाविरुद्ध रणजी सामना खेळल्यानंतर गुजरातला पोहोचला होता. हिमाचल प्रदेशचा संघ ३ जानेवारीपासून बडोदा येथे बडोदाविरुद्ध रणजी सामना खेळणार होता. ३१ डिसेंबरला सराव सुरू असताना सिद्धार्थला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. यानंतर जेव्हा तो टीम हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा वेदना आणखीनच वाढल्या, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
हिमाचल प्रदेश संघाचे सदस्य आणि त्याचा सहकारी डावखुरा फिरकीपटू मयंक डागर ESPNcricinfo ला सांगितले की, "सिद्धार्थ आमच्या संघाचा मुख्य भाग होता. तो संघातील प्रत्येक सदस्याशी चांगला जोडला गेला. बडोद्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. त्याला काही संसर्ग झाल्यासारखे वाटत होते. हॉटेलमध्ये पोहोचत असताना त्याची प्रकृती आणखीनच बिघडली, त्यानंतर त्याला बडोदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले."
डागर पुढे म्हणाले, "३ ते ६ जानेवारीपर्यंत आम्ही बडोद्याविरुद्ध खेळलो, पण सामन्यादरम्यानही आम्ही सर्वांनी सिद्धार्थच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित केले. संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. सामन्यानंतर आम्ही त्याला भेटायला जायचो, पण पुढचा सामना पूर्ण मनाने खेळण्यासाठी आम्हाला त्याला बडोद्यात एकटे सोडावे लागले. त्याचा श्वासोच्छवासाचा त्रास वाढतच गेला, त्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, तिथून त्याचा त्रास वाढला.''
सिद्धार्थने हिमाचल प्रदेश संघासोबत शेवटची विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. यासह इडन गार्डन्सवरील बंगालविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या. त्याने ६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने २५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने एक ट्वेंटी-२० आणि सहा लिस्ट ए सामने खेळले.