आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये उद्या होणाऱ्या उपांत्य सामन्यामध्ये भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रचिन रवींद्रच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. २३ वर्षांच्या रचिनने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ९ सामन्यांत ७०.६२ च्या सरासरीने ५६५ धावा कुटल्या आहेत. तसेच सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि क्विंटन डी’कॉकनंतर तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, भारतीय वंशाचा किवी फलंदाज असलेल्या रचिनचं नाव त्याच्या वडिलांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावातील अक्षरं जोडून ठेवलं होतं, असा दावा करण्यात येत होता. मात्र आता रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी या नावामागचं गुपित उलगडलं आहे.
रचिन रवींद्रचे वडील रवी कृष्णमूर्ती हे भारतातील बंगळुरू येथून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. दरम्यान, त्यांनी सांगितले की, जेव्हा रचिनचा जन्म झाला तेव्हा माझ्या पत्नीनं मुलासाठी रचिन हे नाव सुचवलं होतं. ते नाव आम्हाला आवडलं. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यामध्ये आम्ही फार वेळ दवडला नाही. मात्र त्यानंतर काही वर्षांनी हे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचं मिश्रण असल्याचं आम्हाल समजलं.
रचिन रवींद्रचे वडील पुढे म्हणाले की, रचिन हे नाव ऐकायला चांगलं वाटलं. स्पेलिंगही सोपं आणि छोटं होतं. त्यामुळे हे नाव आम्ही निवडलं. काही काळानं आम्हाला समजलं की, हे राहुल आणि सचिनच्या नावांचं मिश्रण असणारं नाव आहे. हे नाव आम्ही रचिन हा क्रिकेटपटू किंवा अन्य कुणी बनावा म्हणून ठेवलेलं नव्हतं, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
रचिन रवींद्रचे वडील रवि कृष्णमूर्ती हे स्वत: क्रिकेट खेळायचे. मात्र त्यांनी त्यांच्या मुलांना करिअरसाठी कुठलंही क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. त्यातच आता त्यांनी रचिन नावामागचं गुपित उलगडल्यानं रचिन हे नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून ठेवलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र रचिनने नावाला साजेशी कामगिरी करताना वर्ल्डकपमध्ये २५ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी सर्वाधिक धावा आणि शतके फटकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.