भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारताने विजयासाठी ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं 7 विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांनी बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. रविवारच्या या दैदिप्यमान कामगिरीनंतर बांगलादेशच्या महिला संघानं सोमवारी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर ( पुरुष/महिला) बांगलादेशनं प्रथमच पराभवाची चव चाखवली. चुरशीच्या सामन्यात बांगलादेशनं 1 विकेट राखून विजय मिळवला.
सोमवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला संघाने 48.4 षटकांत 210 धावा केल्या. नहीदा खान ( 63), बिस्माह मरूफ ( 34) आणि आलिया रियाझ ( 36) या तिघी वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशच्या रुमाना अहमदने तीन, तर सल्मा खातूनने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला मुर्शीदा खातून ( 44) आणि शर्मिन सुल्तान ( 27) यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर फर्गाना हक ( 67), रुमाना अहमद ( 31) आणि संजीदा इस्लाम ( 20) यांनी बांगलादेशच्या खात्यात धावा जोडल्या. पाकिस्तानकडून सायेदा शाह आणि बिस्माह मरूफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. बांगलादेशनं 49.5 षटकांत 9 विकेट्स गमावून हे लक्ष्य पार केले.