Join us  

क्रिकेट बोर्डाचं ऐतिहासिक पाऊल! न्यूझीलंडच्या पुरूष, महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन

केन विल्यमसन आणि सोफी डिव्हाईन दोन्ही कर्णधारांकडून निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 3:39 PM

Open in App

New Zealand Cricket: न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC) आणि खेळाडू यांच्यातील ऐतिहासिक पाच वर्षांच्या करारानंतर जागतिक क्रिकेटमध्ये प्रथमच, देशातील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सर्व फॉरमॅट आणि स्पर्धांमध्ये समान मानधन मिळणार आहे. NZC चे मुख्य कार्यकारी डेव्हिड वेट यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "एवढ्या महत्त्वाच्या करारापर्यंत पोहोचण्याच्या भूमिकेबद्दल मी खेळाडू आणि बोर्डाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे आभार आणि अभिनंदन करू इच्छितो. या निर्णयाचा आमच्या खेळाडूंना नक्कीच फायदा होईल आणि क्रिकेटमध्ये प्रगती, विकासाचा नवा पाया घातला जाईल."

स्त्री पुरूष एकसमान हा सध्याच्या समाजाच्या विकासाचा पाय मानला जातो. पण अनेक लोकप्रिय क्षेत्रात पुरूष आणि स्त्रिया यांच्यात काही गोष्टीत तफावत दिसून येते. भारतीय क्रिकेटमध्ये देखील पुरूषांना एक सामना खेळण्यासाठी मिळणारे मानधन हे महिला क्रिकेटपटूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पण या विचारांना छेद देणारा निर्णय न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. NZC, सहा प्रमुख संघटना आणि न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन, व्हाईट फर्न्स (न्यूझीलंडचा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ) आणि देशांतर्गत महिला खेळाडूंना सर्व फॉरमॅट आणि स्पर्धांमध्ये पुरुषांप्रमाणेच मॅच फी मिळणार आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय - न्यूझीलंड क्रिकेटच्या पत्रकानुसार, याचा अर्थ टॉप रँकिंग असलेल्या व्हाईट फर्नला वर्षाला जास्तीत जास्त एक लाख 63 हजार 246 न्यूझीलंड डॉलर्स मिळतील. ही रक्कम पूर्वी ८३ हजार ४३२ न्यूझीलंड डॉलर होती. नवव्या क्रमांकावरील खेळाडूला एक लाख 48 हजार 946 न्यूझीलंड डॉलर्स आणि 17व्या क्रमांकावरील खेळाडूला एक लाख 42 हजार 346 न्यूझीलंड डॉलर्स मिळतील. प्रत्येक असोसिएशन अव्वल क्रमांकावर असलेल्या खेळाडूला अधिक पैसे देईल. प्रत्येक मोठ्या संघटनेच्या शीर्षस्थानी असलेल्या महिला देशांतर्गत खेळाडूंना जास्तीत जास्त 19 हजार 146 न्यूझीलंड डॉलर, सहाव्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला 18 हजार 646 न्यूझीलंड डॉलर आणि 12व्या क्रमांकावरील खेळाडूला 18 हजार 146 न्यूझीलंड डॉलर्स मिळतील. या करारानुसार, देशांतर्गत करार मिळवणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या 54 वरून 72 पर्यंत वाढेल, तर पुरुष खेळाडूंना अधिक सामने खेळण्यासाठी आणि प्रशिक्षण आणि खेळण्यात अधिक वेळ घालवण्यासाठी अधिक रिटेनर पैसे मिळतील.

टॅग्स :न्यूझीलंडकेन विल्यमसन
Open in App