आॅस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय नोंदविणाऱ्या विराट आणि सहकाºयांच्या कामगिरीचा किती गर्व वाटतो हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आॅस्ट्रेलियात जिंकणाºया संघाचा सदस्य असणे हे माझे स्वप्न होते. या संघाने ते खरे ठरविले, याचा आनंद आहे.
पर्थमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जी सांघिक कामगिरी केली त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पराभवानंतर चवताळून उभे राहणे आणि मानसिक कणखरतेच्या बळावर वर्चस्व गाजविणे सोपे नसते. विराटच्या नेतृत्वाखालील संघाने मात्र हे काम सोपे केले आणि मालिका २-१ ने जिंकली. चेतेश्वर पुजाराने विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने फलंदाजीची धुरा स्वत:कडे घेत संयमी खेळी केली. त्याने तासन्तास खेळपट्टीवर राहून ज्या धावा उभारल्या तो संयम दोन संघात फरक निर्माण करणारा ठरला. मोक्याच्या क्षणी विराट आणि अजिंक्य रहाणे यांनी तसेच मयांकसारख्या युवा फलंदाजाने बॉक्सिंग डे कसोटीत जे सातत्य दाखविले त्या कौशल्याला सलाम. मयांक तसेच हनुमा विहारी यांची फलंदाजी पाहताना त्यांच्यात कुठलीही भीती जाणवत नव्हती. दोघेही नैसर्गिकपणे खेळले. ऋषभ पंत याचीही फलंदाजी उल्लेखनीय ठरली. भारतीय क्रिकेटसाठी हे सकारात्मक लक्षण आहे.
बुमराहच्या वेगवान माºयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. फिटनेस व कौशल्याच्या बळावर हा गोलंदाज अधिक आक्रमक जाणवतो, तेव्हा प्रतिस्पर्धी फलंदाज अडचणीत येतात. पहिल्या कसोटीत अश्विनचे मोलाचे योगदान राहिले, याशिवाय रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा अखेरच्या सामन्यातील भेदक मारा विसरता येणार नाही. या सर्वांनी गोलंदाजी असो वा फलंदाजी, भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान दिले आहे. हा कसोटी मालिका विजय भारतीय क्रिकेटला नवी उंची प्रदान करणारा ठरणार आहे. या विजयापासून युवा खेळाडू प्रेरणा घेतील, अशी खात्री वाटते. विराटचे नेतृत्व, फलंदाजीची शैली आणि विजयाची सांघिक वृत्ती या बाबीदेखील क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहतील.