मुंबई : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ इतिहास घडवण्याची शक्यता आहे, परंतु हा इतिहास विक्रमी कामगिरीने नव्हे, तर एका वेगळा कारणाने घडू शकतो. इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ संपूर्ण तयारीने जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे दोन संघ एकाच वेळी विविध ठिकाणी खेळताना दिसणार आहे आणि हा ऐतिहासिक क्षण असणार आहे.
एका इंग्रजी वृत्तपक्षान केलेल्या दाव्यानुसार भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापुर्वी दोन सराव सामने खेळणार आहे. मात्र, सराव सामने आणि ट्वेंटी-20 मालिका यांच्या तारखा क्लॅश होत असल्याने भारताचे दोन संघ एकाच वेळी दोन विविध ठिकाणी खेळणार आहेत. ट्वेंटी-20 मालिकेतील सामने 21, 23 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहेत, तर कसोटी मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होईल.
त्यामुळे विराट कोहलीसह क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना सराव सामन्यात खेळावे लागेल आणि उर्वररित खेळाडू ट्वेंटी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा अंदाज इंग्रजी वृत्तपत्राने व्यक्त केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना 2017 मध्ये घडली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ भारत दौऱ्यावर होता आणि त्याचवेळे ट्वेंटी-20 संघ श्रीलंका दौऱ्यावर होता.