पोटचेफ्सट्रुम : सलामीवीर परवेझ हुसैन इमोन (४७) आणि कर्णधार अकबर अली (४३*) यांच्या संयमी खेळाच्या जोरावर बांगलादेशने ऐतिहासिक विजय मिळवताना क्रिकेटविश्वात पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत गतविजेत्या भारताला डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे धक्कादायकरीत्या ३ गड्यांनी नमविले.
सेनवास पार्क स्टेडियमवर भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र संपूर्ण स्पर्धेत डार्कहॉर्स प्रमाणे खेळलेल्या बांगलादेशने अनपेक्षित धक्का देताना क्रिकेटविश्वाला धक्का दिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव ४७.२ षटकांमध्ये १७७ धावांमध्ये संपुष्टात आणल्यानंतर बांगलादेशने ४२.१ षटकांत ७ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. दरम्यान ४१व्या षटकानंतर पावसामुळे काही वेळ खेळ थांबल्यानंतर बांगलादेशला १७० धावांचे सुधारीत लक्ष्य मिळाले. डकवर्थ लुईस नियमानुसार यावेळी बांगलादेश संघ १८ धावांनी आघाडीवर होते. तेव्हाच भारताचे उपविजेतेपद जवळपास निश्चित झाले होते.
भारताने अपेक्षित कामगिरी करताना माफक धावसंख्येचा पाठलाग करणाºया बांगलादेशची एकवेळ ६ बाद १०२ धावा अशी अवस्था केली होती. मात्र इमोन आणि अकबर यांनी ४१ धावांची भागीदारी करुन भारताचे विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. इमोनने ७९ चेंडूंत ७ चौकारांसह ४७, तर अकबरने ७७ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ४३ धावा केल्या.
अन्य फलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. मात्र धावांचे पुरेसे पाठबळ नसल्याने भारतीय गोलंदाजांना वर्चस्व मिळवूनही संघाला विजयी करता आले नाही. फिरकीपटू रवी बिश्नोईने बांगलादेशचे पहिले ४ बळी मिळवत सामना भारताच्या बाजूने झुकविला होता. त्याने ३० धावांत ४ बळी घेतले. सुशांत मिश्रा (२/२५) व यशस्वी जैस्वाल (१/१५) यांनीही मोक्याच्यावेळी बळी घेतले.
केवळ तिघांनीच गाठली दुहेरी धावसंख्या
यशस्वीव्यतिरिक्त तिलक वर्मा याने ६५ चेंडूंत ३ चौकारांसह ३८ धावा केल्या. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यानेही ३८ चेंडूंत एका चौकारासह २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दखल घेण्याची बाब म्हणजे या तिघांचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
च्संपूर्ण स्पर्धेत निडरपणे खेळलेला भारतीय संघ पहिल्यांदाच आणि तेही अंतिम सामन्यात दडपणाखाली खेळताना दिसला. याचे सर्व श्रेय अर्थातच बांगलादेशच्या गोलंदाजाना जाते. नाणेफेक जिंकून कर्णधार अकबर अलीने घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय सार्थक लावताना गोलंदाजांनी भारताला मर्यादित धावसंख्येत रोखले.
तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या आणि कमालीचे सातत्य राखलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या आणखी एका दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला समाधानकारक मजल मारण्यात यश आले. यशस्वीने १२१ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ८८ धावांची संयमी खेळी केली. एका बाजूने सर्व प्रमुख फलंदाज झटपट बाद होत असताना यशस्वीने भक्कम खेळी करताना आपल्यावर दडपण येऊ दिले नाही. त्याने बांगलादेशच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. चांगल्या चेंडूंना योग्य तो सन्मान देतानाच त्याने संधी मिळतानाच आक्रमक फटके मारत भारताच्या धावफलकाला हलते ठेवले.
७४ धावांमध्ये पालटले चित्र
९ धावांवर भारताला पहिला धक्का बसल्यानंतर यशस्वी-तिलक यांनी ९४ धावांची दमदार भागीदारी केली. मात्र यानंतर भारताने अवघ्या ७४ धावांमध्ये ९ गडी गमावले. अविषेक दास याने ४० धावांत ३ बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. शोरिफूल इस्लाम आणि तंंझीम हसन शाकिब यांनीही प्रत्येकी २ बळी घेत अविषेकला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४७.२ षटकांत सर्वबाद १७७ धावा (यशस्वी जैस्वाल ८८, तिलक वर्मा ३८, ध्रुव जुरेल २२; अविषेक दास ३/४०, तंंझीम हसन शाकिब २/२८, शोरिफुल इस्लाम २/३१.) पराभूत वि. बांगलादेश (डकवर्थ लुईस नियमानुसार) : ४२.१ षटकांत ७ बाद १७० धावा. (परवेझ हुसैन इमोन ४७, अकबर अली ४३; रवी बिश्नोई ४/३०, सुशांत मिश्रा २/२५.)
सामनावीर : अकबर अली.
मालिकावीर : यशस्वी जैस्वाल.
Web Title: Historical performance of Bangladesh youth in u19 Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.