नवी दिल्ली : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा दरारा अजूनही संपलेला नाही. काही जणांनी मलिंगाला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. पण आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. मलिंगाने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यात मलिंगाने चक्क एकाच षटकात 'बळीचौकार' खेचल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात मलिंगाने कमाल केली. आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मलिंगाने न्यूझीलंडच्या फलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. या सामन्यात चार षटकांमध्ये फक्त सहा धावा देत पाच फलंदाजांना बाद करण्याची किमया साकारली.
मलिंगाने यावेळी तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला बळी घेतला. त्यानंतर सलग तीन फलंदाजांना मलिंगाने बाद केले आणि हॅट्रिकसह सलग चांर चेंडूंमध्ये चार फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली. मलिंगाच्या पाच बळींच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंवर दमदार विजय साकारला.