T20 Blast : आशिया चषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी खेळाडू चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. इंग्लंडच्या T20 ब्लास्टमध्ये शादाब खानने गोलंदाजी व फलंदाजीत कहर केला होता. त्यात पाकिस्तान संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ( Shaheen Afridi) इंग्लंडमध्ये असा पराक्रम केला जो ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. डावाच्या पहिल्याच षटकात शाहीनने चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच षटकात सर्वाधिक चार बळी घेणारा तो आता जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे.
बर्मिंगहॅम बेअर्सने ट्वेंटी-२० ब्लास्टमध्ये नॉटिंगहॅमशायरसमोर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नॉटिंगहॅमशायरचा टॉम मूर्स ( ७३ धावा) वगळता अन्य खेळाडूंना अपयश आले. मूर्सने ४२ चेंडूंत ६ चौकार आणि ४ चार षटकारांसह ही दमदार खेळी केली. नॉटिंगहॅमशायरने २० षटकांत १६८ धावा केल्या. बर्मिंगहॅमकडून हसन अली आणि जेक लिनॉटने प्रत्येकी तीन बळी घेतले.
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंगहॅमची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने कमाल केली. शाहीनचा पहिला चेंडू वाईड होता आणि ज्यावर ५ धावा आल्या. यानंतर शाहीनने पहिल्या दोन चेंडूत सलग दोन विकेट घेतल्या. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सिंगल दिल्या. पुन्हा पाचव्या आणि शेवटच्या चेंडूवर सलग दोन विकेट घेतल्या. एका षटकानंतर बर्मिंगहॅमच्या ७ धावांत ४ विकेट पडल्या आणि पहिल्याच षटकात चार बळी घेणारा शाहीन ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव वेगवान गोलंदाज ठरला.
पहिल्याच षटकात चार बळी घेतल्यानंतर उर्वरित तीन षटकांत शाहीनला एकही विकेट मिळाली नाही. बर्मिंगहॅमसाठी रॉब येट्सने ४६ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ६५ धावा केल्या. जेक लिनॉटने २२ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २७ धावा करत बर्मिंगहॅमला विजय मिळवून दिला. बर्मिंगहॅम संघाने १९.१ षटकात ८ विकेट गमावत १७२ धावा केल्या.