New Zealand vs Sri Lanka : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद येथे सुरू असलेली चौथी कसोटी ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४८० धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ५७१ धावा केल्या आणि आता ऑस्ट्रेलिया पाचव्या दिवशी सावध खेळ करताना दिसतेय. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) प्रवेश मिळवण्यासाठी भारताला ही कसोटी जिंकणे गरजेचे होते, परंतु ती ड्रॉ होणार असे दिसत आहे. असे असतानाही भारताने कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश पक्का केला. भारताचा मित्र त्यांच्या मदतीला धावून आला आणि कसोटीत त्यांच्याकडून ट्वेंटी-२० स्टाईल फलंदाजी पाहायला मिळाली.
न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांवरही भारताचे फायनलचे गणित अवलंबून होते. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी ड्रॉ राहिल्यास श्रीलंकेचा पराभव किंवा ड्रॉ निकाल भारतासाठी फायद्याचा ठरणारा होता. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत रोमहर्षक विजय मिळवून भारताला मदत केली. भारतासोबत श्रीलंकाही कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीत होती, परंतु क्राईस्टचर्च कसोटी ड्रॉ राहिल्याने श्रीलंका शर्यतीतून बाद झाली आणि भारत-ऑस्ट्रेलिया असा फायनल सामना ७ जून पासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३५५ धावा केल्या आणि न्यूझीलंडचा पहिला डाव ३७३ धावांवर गुंडाळला. श्रीलंकेला दुसऱ्या डावात ३०२ धावाच करता आल्या. अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला यजमान न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य ठेवता आले. पाचव्या दिवशी पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने षटकं कमी करावी लागली आणि त्यानंतर किवी फलंदाजांनी सावध खेळ केला. डेव्हॉन कॉनवे ( ५), टॉम लॅथम ( २५) आणि हेन्री निकोल्स ( २०) माघारी परतल्यानंतर केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांनी डाव सावरला. अखेरची १२ षटकं शिल्लक असताना दोघांनी आक्रमक खेळ सुरू करून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यांना १२ षटकात ७८ धावा करायच्या होत्या.
यापूर्वीच्या १० षटकांत मिचेल व केन यांनी ७.५०च्या सरासरीने धावा चोपल्या. केन व मिचेल यांनी १५७ चेंडूंत १४२ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मिचेल ८६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर बाद झाला. टॉम ब्लंडल ( ३) लगेच माघारी परतला. न्यूझीलंडला ३२ चेंडूंत ३९ धावांची गरज असताना निम्मा संघ माघारी परतला होता. केनने २७वे कसोटी शतक पूर्ण करताना किवींच्या विजयाचे प्रयत्न सुरू ठेवले होते. ३ षटकांत २० धावा किवींनी करायच्या होत्या आणि मिचेल ब्रेसवेल १० धावांवर बाद झाला. टीम साऊदीही बाद झाला अन् ६ चेंडू ८ धावा असा सामना रंजक वळणावर आला. केन विलियम्सनने अविश्वसनीय खेळी करून संघाला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. केनने 194 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकारासह नाबाद 121 धावा केल्या आणि किवींनी 8 बाद 285 दावा करून विजय पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"