भारताच्या युझवेंद्र चहल आणि दीपक चहर यांचा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड मलेशियाचा वेगवान गोलंदाजाने मोडला. ICC 2024 T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आशिया विभागीय पात्रता B स्पर्धेमध्ये चीन आणि मलेशिया यांच्यात ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. यामध्ये मलेशियाचा वेगवान गोलंदाज स्याजरुल इद्रुसने ( Syazrul Ezat Idrus ) ८ धावांत ७ बळी घेतले आणि तो ट्वेंटी-२० त ७ विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या गोलंदाजीसमोर चीनचा संघ अवघ्या २३ धावांत गारद झाला आणि मलेशियाने ४.५ षटकांत २ गडी विजय मिळवला.
बायमस ओव्हल मैदानावर चीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्याजरुल इद्रुसने चार षटकांच्या स्पेलमध्ये एक ओव्हर मेडन टाकत ८ धावा देत ७ विकेट्स घेतल्या. चीनचे ६ फलंदाज शून्यावर बाद झाले आणि एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. २४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाने अवघ्या तीन धावांत दोन गडी गमावले. विरनदीप सिंगने १४ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह १९ धावांची नाबाद खेळी करत संघाला ४.५ षटकांत विजय मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात पीटर आहो, युझवेंद्र चहल, दीपक चहर, अॅश्टन अगर आणि अजंथा मेंडिस यांच्यासह एकूण १२ गोलंदाजांना आतापर्यंत ६ विकेट घेण्यात यश आले आहे.
Web Title: History! Malaysia seamer Syazrul Ezat Idrus recorded the first seven-wicket haul in a Men's T20I in ICC Men’s T20 World Cup 2024 Asia Regional Qualifier B tournament, China 23 All Out (11.2)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.