Join us  

IND vs SA, 2nd T20I Live Updates : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला; David Miller, क्विंटन डी कॉकची टफ फाईट!

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने २३८ धावांचे लक्ष्य उभे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 11:11 PM

Open in App

India vs South Africa, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने २३८ धावांचे लक्ष्य उभे केले. रोहित व लोकेशने ९६ आणि सुर्या व विराट यांनी १०२ धावांची भागीदारी करताना आफ्रिकन गोलंदाजांना चोपून काढले. भारतीय गोलंदाजांनीही चांगला मारा करताना दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या ट्वेंटी-२०त हार मानण्यास भाग पाडले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी आफ्रिकेच्या विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. 

विराटने ट्वेंटी-२०त ११००० धावा करण्याचा इतिहास रचला, पण ४९ धावांवर असताना बघा कसा वागला

लोकेश राहुल  ( ५७ ) व रोहित शर्मा ( ४३) या जोडीने ९६ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने मारलेले उत्तुंग फटके आणि लोकेशची तंत्रशुद्ध फलंदाजी चाहत्यांना खिळवणारी ठरली. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कुटून काढले. त्याने कागिसो रबाडाच्या एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण केल्या. सूर्याने ५७३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १००० + धावा करताना ग्लेन मॅक्सवेलचा ( ६०४) व कॉलिन मुन्रोचा ( ६३५) विक्रम मोडला.  सूर्या व विराट यानी ४२ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. १९व्या षटकात सूर्या रन आऊट झाला. त्याने २२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी केली, परंतु विराटला २८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४९ धावांवर नाबाद राहावे लागले. कार्तिकने ७ चेंडूंत १७ धावा करताना भारताला ३ बाद २३७ धावांचा पल्ला गाठून दिला.  

अर्शदीप सिंगने आज  पुन्हा कमाल केली आणि आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला ( ०) व रिली रोसोवू ( ०) यांना माघारी पाठवून भारताला मोठे यश मिळवून दिले. पहिल्या षटकात बवुमाला जीवदान मिळाले होते, रिषभकडून झेल सुटला होता. अर्शदीपच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिककडूनही चेंडू निसटला होता, परंतु त्याने प्रसंगावधान दाखवून झेल टिपला. आफ्रिकेच्या १ धावावर दोन विकेट्स पडल्या.  क्विंटन डी कॉकच्या सोबतीने एडन मार्करमने आफ्रिकेचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला होता. पण, अक्षर पटेलने त्याला माघारी पाठवले. तो १९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर त्रिफळाचीत झाला. क्विंटन आणि डेव्हिड मिलर यांनी अर्धशतकी भागीदारी करताना आफ्रिकेच्या फलकावर १०० धावा चढवल्या. आर अश्विनने टाकलेल्या १२ व्या षटकात मिलरने १९ धावा कुटल्या. आफ्रिकेला अखेरच्या ८ षटकांत १३६ धावा करायच्या होत्या. मिलरने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना दक्षिण आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक १९४५* धावांचा विक्रमही नावावर केला. त्याने जेपी ड्यूमिनिचा १९३४ धावांचा विक्रम मोडला. 

क्विंटनची बॅट अन् चेंडूचा योग्य संपर्क होत नव्हता, पण अक्षर पटेलच्या दोन खणखणीत षटकार खेचून त्याने तो ताळमेळ अखेर मिळवला. त्याने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आफ्रिकेला २४ चेंडूंत ८३ धावा करायच्या होत्या आणि त्या जवळपास अशक्यच होत्या. त्यांना २०.५०च्या रन रेटने फटकेबाजी करायची होती. क्विंडन व मिलर हे दोन्ही सेट फलंदाज मैदानावर होते. दीपक चहरने १७व्या षटकात ८ धावा दिल्याने आफ्रिकेवरील दडपण वाढले. अर्शदीपने टाकलेल्या १९व्या षटकात या दोघांनी २६ धावा चोपल्या. अखेरच्या षटकात ३७ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. त्यात भारताला ३० यार्ड बाहेर एक खेळाडू कमी उभा करण्याची पेनल्टी बसली.

अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवर १ धाव देत त्याचं काम केलं. मिलरने सलग दोन षटकार खेचून शतक पूर्ण केले. त्याने ४६ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह शतक पूर्ण केले. पण, हे शतक व्यर्थ ठरले अन् भारताने सामना जिंकून मालिकेत २-० अशी  विजयी आघाडी घेतली. भारताने १६ धावांनी हा सामना जिंकला.  मिलर १०६ धावांवर , तर क्विंटन ४८ चेंडूंत ३ चौकार व ४  षटकारांसह ६९ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ३ बाद २२१ धावा केल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासूर्यकुमार अशोक यादवक्विन्टन डि कॉक
Open in App