लखनौ : पहिल्या दोन टी-२० सामन्यांत सुमार कामगिरी केलेल्या भारतीय महिला संघाने अखेरच्या टी-२० सामन्यांत भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेला ७ बाद ११२ धावांत रोखले. राजेश्वरी गायकवाडने ४ षटकांत ९ धावांत ३ बळी घेत आफ्रिकेला धक्के दिले. यानंतर शेफाली वर्माने (६०) स्फोटक फलंदाजीने भारताचा दणदणीत विजय साकारला.
दक्षिण आफ्रिकेतर्फे कर्णधार सुन लुसने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. लॉरा गुडॉल (२५), टुनिक्लिफ (१८), सिनालो जाफा (१६) यांच्या योगदानामुळे आफ्रिकेला शंभर धावांचा पल्ला ओलांडता आला. १५व्या षटकांत ६३ धावांमध्ये त्यांनी अर्धा संघ गमावला होता.भारतातर्फे राजेश्वरीच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचे फलंदाज अडखळले. अरुंधती रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा व सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी एक बळी घेत तिला योग्य साथ दिली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ११ षटकांतच १ बाद ११४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ७ बाद ११२ धावा (सुने लूस २८, लॉरा गुडॉल नाबाद २५, फाये टुनिक्लिफ १८, सिनालो जाफ्ता १६, लिझेल ली १२; राजेश्वरी गायकवाड ३/९, अरुंधती रेड्डी १/१८, राधा यादव १/२४, दीप्ती शर्मा १/२२, सिमरन बहादूर १/२९) पराभूत वि. भारत : ११ षटकांत १ बाद ११४ धावा (शेफाली वर्मा ६०, स्मृती मानधना नाबाद ४८; नदिने डीक्लर्क १/१८)