Join us

हिटमॅन रोहित शर्मा आज जो काही आहे तो फक्त महेंद्रसिंग धोनीमुळेच - गौतम गंभीर

rohit sharma :  रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषकात भारतीय संघाचा विजयरथ सुरू आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 13:10 IST

Open in App

gautam gambhir on rohit sharma : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषकात भारतीय संघाचा विजयरथ सुरू आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करून रोहितसेनेने अंतिम फेरीत स्थान मिळवले. सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करून हिटमॅन रोहितने संघाला चांगली सुरूवात करून दिली. रोहितच्या नेतृत्वाचे आणि खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने हिटमॅनच्या यशाचे श्रेय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिले. रोहित शर्मा आज जो काही आहे तो फक्त महेंद्रसिंग धोनीमुळेच, असे गंभीरने म्हटले.

मंगळवारी सुपर ४ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात समालोचन करताना गंभीरने भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले. त्याने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमात म्हटले, "रोहित शर्मा आज महेंद्रसिंग धोनीमुळे रोहित शर्मा बनला आहे. धोनीने त्याला सुरूवातीच्या काळात खूप पाठिंबा दिला, सहकार्य केले, जेव्हा तो स्ट्रगल करत होता."

दरम्यान, गंभीरने रोहितच्या पडत्या काळाचा दाखला दिला. रोहित सुरूवातीला मधल्या फळीत फलंदाजी करायचा. त्याने कारकिर्दीची सुरूवातच इथून केली. पण, कालांतराने धोनीने हिटमॅनला सलामीवीर म्हणून आजमावले. त्यानंतर लगेचच रोहित भारतीय संघातील महत्त्वाचा सदस्य बनला अन् कर्णधारपदासाठी पात्र ठरला. 

भारताची अंतिम फेरीत धडकआशिया चषक २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक लगावून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. काल झालेल्या सामन्यात 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेला ४१ धावांनी पराभूत करून टीम इंडियाने सलग तिसरा विजय साकारला. या विजयामुळे शेजारी पाकिस्तानला सुखद धक्का मिळाला. कारण पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आता अंतिम फेरीसाठी लढत होईल. यातील विजयी संघ भारतासोबत रविवारी अंतिम सामना खेळेल. 

टॅग्स :गौतम गंभीररोहित शर्माएशिया कप 2023भारत विरुद्ध श्रीलंकामहेंद्रसिंग धोनी