मतीन खान स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांची आतषबाजी करणे सोपे काम नाही. १५० किमी प्रतिताशी वेगाने येणाऱ्या चेंडूवर तितक्याच ताकदीने मैदानाबाहेर फटका मारणे त्यातही कठीणच. सीमा रेषेच्यावरून उत्तुंग टोलेबाजी करण्याचा ‘दम’ केवळ क्षमतावान खेळाडूंच्याच आवाक्यात असतो.
आंतरराष्ट्रीय षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा जगात तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्यातही सरासरीत तो नंबर वन ठरतो. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४६३ षटकार ठोकले. ३९८ आंतरराष्ट्रीय सामन्यात (तीनही प्रकारात) तो ४१४ डाव खेळला असून षटकारांची सरासरी जवळपास १.१२ इतकी आहे.
जगात सर्वाधिक षटकारांचा विक्रम ‘युनिव्हर्स बॉस’ वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने ४८३ सामन्यात ५५१ डावात एकूण ५५३ षटकार मारले आहेत. याचा अर्थ गेलने प्रत्येक डावात किमान एक तरी षटकार मारलाच. दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदी आहे. आफ्रिदी ५२४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०९ धावा खेळला. त्याचे ४७६ षटकार आहेत. त्याची सरासरी एका षटकारापेक्षा थोडी कमीच आहे. यादृष्टीने रोहित हा जगातील सर्वांत उत्कृष्ट षटकारवीर ठरतो. सोबतच्या यादीवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की जगातील उत्कृष्ट खेळाडूंची सरासरी रोहितच्या जवळपासही दिसत नाही.
स्टेडियममध्ये उपस्थित हजारो आणि टीव्हीवर नजर रोखून धरणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांना लागलेला एक षटकार सुखावून जातो. हाच उत्तुंग फटका खेळाडूच्या क्षमतेचा परिचय घडवून आणतो. फलंदाजातील ताकद आणि ‘टायमिंग’ किती अचूक असते याची खात्री पटते.
रोहित हा ‘लेजी एलिगन्स’साठी प्रख्यात आहे. वेगवान गोलंदाजांना हूक करीत फाईन लेगवर षटकार मारण्यात तो पटाईत आहे. याशिवाय पायांची थोडी हालचाल करीत ताकदीने ‘फ्लिक’ करताच तो चेंडू मिडविकेटच्या वरून सीमापार करतो. फिरकीवर तो पारंपरिकरित्या पुढे येत (डान्सिंग डाऊन द ट्रॅक) गोलंदाजाच्या डोक्यावरुन चेंडू थेट बाहेर मारतो. रोहितमधील हाच गुण त्याला अन्य खेळाडूंच्या तुलनेत वेगळा दर्शवितो. त्याचे फटकेदेखील दर्शनीय असतात. सीमारेषेवर पाच-सहा क्षेत्ररक्षक असताना तुम्ही त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमापार मारता तेव्हा शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा खरा परिचय घडतो. हीच ताकद रोहितला खरा ‘हिटमॅन’ बनविते. रोहितने कारकिर्दीत ज्या पद्धतीने वन डेत तीन दुहेरी शतके ठोकली त्यामुळे तो सर्व खेळाडूंमध्ये ‘महान’ ठरतो. तो केवळ भारताचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचादेखील ‘हिटमॅन’ आहे. दुनिया तो बस जिगर वालों को ही सलाम करती है , पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है...
क्रमांक खेळाडू सामने डाव षटकार षटकारांची सरासरी १ रोहीत शर्मा ३९८ ४१४ ४६३ १.१२ २ ख्रिस गेल ४८३ ५५१ ५५३ १.०० ३ मार्टिन गुप्तील ३४५ ३८० ३६९ ०.९७ ४ इयोन मॉर्गन ३७७ ३५९ ३४६ ०.९६ ५ शाहिद आफ्रिदी ५२४ ५०८ ४७६ ०.९४ ६ ब्रॅडम मॅक्युलम ४३२ ४७४ ३९८ ०.८४ ७ जोस बटलर २९३ ३०३ २४८ ०.८२ ८ शेन वॉटसन ३०७ ३३४ २४५ ०.७३ ९ महेंद्रसिंग धोनी ५३८ ५२६ ३५९ ०.६८ १० एबी डिव्हिलियर्स ४२० ४८४ ३२८ ०.६८ ११ युवराज सिंग ४०२ ३९१ २५१ ०.६४ १२ डेव्हीड वॉर्नर ३०७ ३८१ २४२ ०.६४ १३ ॲडम गिलख्रिस्ट ३९६ ४२९ २६२ ०.६१ १४ विरेंद्र सेहवाग ३७४ ४४३ २४३ ०.५५ १५ सनथ जयसुर्या ५८६ ६५१ ३५२ ०.५४ १६ रॉस टेलर ४४७ ५०७ २७२ ०.५४ १७ सौरव गांगुली ४२४ ४८८ २४७ ०.५१ १८ विराट कोहली ४५६ ५०८ २४१ ०.४७ १९ जॅक कॅलिस ५१९ ६१७ २५४ ०.४१ २० रिकी पॉटिंग ५६० ६६८ २४६ ०.३७ २१ सचिन तेंडुलकर ६६४ ७८२ २६४ ०.३४
या यादीत सचिन तेंडूलकरचा एकविसावा क्रमांक लागत असल्याने एकूण २१ खेळाडूंची आकडेवारी दिली आहे.