Join us

कृत्रिम पदार्थाच्या वापरास होल्डिंग यांचा विरोध

दक्षिण आफ्रिकेचा माजी महान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने मात्र याचे समर्थन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 03:36 IST

Open in App

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे चेंडूवर लकाकी आणण्यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर वैध ठरविणे विरोधाभास निर्माण करणारा असल्याचे वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी महान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने मात्र याचे समर्थन केले आहे.पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक व माजी दिग्गज वकार युनूस यांनी म्हटले की, चेंडू चमकविण्यासाठी थुंकी व घाम याला आणखी कुठला पर्याय असू शकत नाही.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोविड-१९ महामारीनंतर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयसीसी चेंडूवर थुंकीऐवजी कृत्रिम पदार्थाचा वापर वैध ठरविण्याबाबत विचार करीत आहे.होल्डिंग म्हणाले, ‘मी वाचले आहे की आयसीसी कोविड-१९मुळे चेंडूवर थुंकीचा वापर रोखण्याबाबत विचार करीत आहे आणि खेळाडूंना चेंडूची लकाकी कायम राखण्यासाठी पंचासमक्ष कृत्रिम पदार्थाच्या वापराची परवानगी देण्याबाबत विचार करीत आहे. मला हे काही तर्कसंगत वाटत नाही.’ होल्डिंग पुढे म्हणाले, ‘आयसीसीने अशा स्थितीला सामोरे जाण्यापेक्षा ज्यावेळी परिस्थिती योग्य असेल त्यावेळी क्रिकेट सुरू करायला हवे.’होल्डिंग पुढे म्हणाले, ‘आयसीसीच्या मते क्रिकेट सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवसांपर्यंत क्वारंटाईन राहावे लागेल. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की जर खेळाडू हा कालावधी पूर्ण करणार असतील तर ते थुंकीचा वापर का करू शकणार नाही? जर दोन आठवडे वेगळे राहिल्यानंतरही जर कुणाच्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित होत असेल तर तुम्ही अशा स्थितीमध्ये क्रिकेट कसे खेळू शकता. याचा अर्थ तुम्ही सर्वांना संकटात टाकत आहात.’पाकिस्तानचे दिग्गज वकार युनूस यांनी स्पष्ट केले की, थुंकीचा वापर आवश्यक आहे आणि स्पर्धात्मक क्रिकेट सुरू झाल्यानंतर याचा वापर थांबविता येणार नाही. एक वेगवान गोलंदाज म्हणून माझा याला विरोध आहे. कारण थुंकी व घाम एक प्राकृतिक प्रक्रिया आहे. एक चेंडू दिवसभर एका हातातून दुसऱ्या हातात जात असतो. घाम व थुंकीचा वापर नैसर्गिक आहे. हे सवयीप्रमाणे आहे. तुम्ही यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.’तुम्ही गोलंदाजांना कृत्रिम पदार्थ लावण्यास देऊ शकता, पण खेळादरम्यान थुंकी व घामाचा वापर करण्यापासून रोखणे शक्य नाही.डोनाल्डने कृत्रिम पदार्थाचे समर्थन करताना म्हटले की, ‘मी चेंडूची छेडखानी करण्याला वैध बनविण्यास सहमत आहे. मी २००० च्या दशकात एका लेखामध्ये असे म्हटले होते. ते तसेही घडत असते. लोक जमिनीवर चेंडू फेकतात आणि पंच तसे करण्यास मनाई करतात, हे आपल्या निदर्शनास येते. ते असे का करतात, हे सर्वांना कळते. कृत्रिम पदार्थ वापरावर नजर ठेवली तर हा मुद्दा उपयुक्त ठरू शकतो.’ (वृत्तसंस्था)