Join us

विश्वचषकात घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मोलाचा: रोहित शर्मा

चाहत्यांच्या जोरावर जिंकण्याचा विश्वास, रोहितने २०१९ सालच्या विश्वचषकात विक्रमी पाच शतके ठोकली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 06:02 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘यंदाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात रंगणार असून, या स्पर्धेत घरच्या प्रेक्षकांकडून मिळणारा जबरदस्त पाठिंबा मोलाचा ठरणार आहे. या जोरावर आमच्या संघाला विश्वविजेतेपद जिंकण्याचा विश्वास आहे,’ असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले. भारताने २०११ साली मायदेशात विश्वचषक जिंकला होता. 

रोहित म्हणाला की, ‘मी या सर्वोच्च स्पर्धेतील हा जबरदस्त पाठिंबा इतक्या जवळून पाहिलेला नाही. २०११ साली नक्कीच संघाने जेतेपद पटकावले होते. पण, त्यावेळी त्या संघात माझा समावेश नव्हता. हा सुंदर चषक आहे आणि यामागे अनेक आठवणी, इतिहास आहे.’ वेस्ट इंडीजविरूद्धच्या अखेरच्या दोन टी-२० सामन्यांत रोहित खेळणार असल्याची शक्यता आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतातील दहा शहरांमध्ये खेळली जाईल. रोहितने म्हटले की, ‘मला माहितेय की, मैदानावर आम्हाला जबरदस्त समर्थन लाभेल. हा विश्वचषक आहे आणि याची सर्वांनाच प्रतीक्षा असते. भारतात ही स्पर्धा १२ वर्षांनी होत आहे. गेल्या वेळी २०११ साली आम्ही यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविले.’ 

‘सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रयत्न’रोहितने २०१९ सालच्या विश्वचषकात विक्रमी पाच शतके ठोकली होती. रोहित पुढे म्हणाला की, ‘मी २०१५ आणि २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धा खेळलो आहे. शानदार अनुभव होता. आम्ही उपांत्य फेरीपर्यंत पोहचलो. पण, अंतिम फेरी गाठू शकलो नाही. आता विश्वचषक भारतात रंगणार असून, सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. विश्वचषकात प्रत्येक दिवस नवीन असतो आणि नवीन सुरुवात करावी लागते. हे कसोटी क्रिकेटसारखे नसते, की एक दिवस तुम्ही वर्चस्व गाजवले की पुढील दिवसही ते कायम राहील.’ 

टॅग्स :रोहित शर्मा
Open in App