Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये अफगाणिस्तान व भारत यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून आपले स्थान पक्के केले आहे. आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील विजेता संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरले. चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान व हाँगकाँग यांच्यातला सामना निर्णायक ठरणार आहे. अ गटात पाकिस्तान व हाँगकाँग यांना दोघांना भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सुपर ४ साठी दोन्ही संघांन विजय महत्त्वाचा आहे.
पाकिस्तानने पहिल्या सामन्यात १४७ धावा केल्या आणि भारताने ५ विकेट्स राखून विजय मिळवताना मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. हार्दिक पांड्याने ३ विकेट्स व नाबाद ३३ धावांची अष्टपैलू कामगिरी करून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. २६ चेंडूंत ६८ धावांची स्फोटक खेळी करताना त्याने भारताला १९२ धावांचा डोंगर उभा करून दिला. विराट कोहलीनेही ५९ धावांची खेळी केली. लोकेश राहुलनेही चांगली फलंदाजी केली. प्रत्युत्तरात हाँगकाँगने १५० धावा केल्या. म्हणजेच पाकिस्तानपेक्षा हाँगकाँगने धावा अधिक केल्या आहेत.
आता हाँगकाँगने अखेरच्या साखळी सामन्यात धक्कादायक निकाल लावल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान व नसीम शाह यांच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि ते पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढू शकते. चांगल्या फॉर्मात असलेला बाबर आजम भारताविरुद्ध अपयशी ठरला होता. रिझवानने एकट्याने खिंड लढवली होती. हाँगकाँगचे बाबर हयात, किंचित शाह, झीशान अली हे पाकिस्तानची डोकेदुखी वाढवू शकतात. त्यांनी भारताविरुद्ध दमदार फलंदाजी केली होती.
आशिया चषक स्पर्धेचा इतिहास!
१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.