नवी दिल्ली - ND vs NZ , 1st Test Upadets : पदार्पणाच्या सामन्यातच श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावत इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिलं शतक झळकावलं. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. आपल्या पदार्पणतील शतकी खेळीने अय्यरने 5 विक्रम बनवले आहेत. त्यासोबतच, स्वत:चे एक स्वप्नही पूर्ण केलंय. कारण, श्रेयसच्या घरी जेवण करायला आता त्याचे गुरू येणार आहेत.
श्रेयश अय्यरच्या क्रिकेट करिअरमध्ये एका व्यक्तीचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच, श्रेयशने त्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, अगोदर तू आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये शतक पूर्ण कर, त्यानंतरच मी तुझ्या घरी जेवायला येतो, असे अभिवचन त्यांनी दिलं होतं. आता, श्रेयशने पदार्पणातच न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावलं आहे. न्यूझीलंडविरोधात पदार्पण करत शतक ठोकणारा श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९७६ मध्ये सुरिंदर अमरनाथ यांनी आणि १९५५ मध्ये एजी कृपाल सिंह यांनी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकलं होतं.
मुंबई संघाचे कोच आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू प्रवीण आम्रे हीच ती व्यक्ती आहे. श्रेयसनं शुक्रवारी शतक झळकावून आम्रेंना घरी जेवायला बोलवण्याचा अधिकार मिळवला, तसेच स्वत:चं स्वप्नही पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रेयसनं या गोष्टीचा आणि गुरुंनी ठेवलेल्या अटीचा खुलासा केला. तुला टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल तेव्हा ती तुझी मुख्य उपलब्धी असेल, असे प्रवीण सर म्हणायचे. मला टेस्ट क्रिकेटची कॅप मिळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला असणार. आता, मी त्यांना मेसेज करणार असून घरी जेवायला बोलवणार आहे, असे श्रेयशने सांगितले.
मुलानं कसोटी क्रिकेट खेळावं ही श्रेयशच्या वडिलांची इच्छा होती आणि त्याच्या पदार्पणानं ती पूर्ण झाली. त्यात कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयसनं शतक झळकावून दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावलं. मागील दोन वर्ष श्रेयससाठी खूप कष्टाची राहिली आणि आजच्या शतकानंतर त्याला मेहनतीचं फळ मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान, श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला.