लंडन : ‘विश्वचषक स्पर्धेदरम्यान केनिंगटन ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत चांगल्या खेळपट्ट्या मिळतील,’ अशी आशा भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने व्यक्त केली. ओव्हलच्या खेळपट्टीवर सराव सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या लढतीत अर्धशतक झळकावणारा जडेजा एकमेव फलंदाज ठरला. फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब नसल्याचे जडेजाने सांगितले.
सामन्यानंतर जडेजा म्हणाला,‘इंग्लंडच्या सर्वसाधारण परिस्थितीप्रमाणे येथील स्थिती होती. खेळपट्टीमध्ये सुरुवातीला ओलावा होता. काही तासानंतर खेळपट्टी चांगली होत गेली. विश्वकप स्पर्धेत एवढी हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या मिळणार नाही, अशी आशा आहे. खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असतील.’ भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव गोलंदाजांसाठी अनुकूल स्थितीमध्ये १७९ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडने सहज लक्ष्य गाठले.
जडेजा म्हणाला,‘येथे आमची पहिलीच लढत होती. ही एक लढत होती. एका खराब डावामुळे खेळाडूंचे आकलन करू शकत नाही. त्यामुळे फलंदाजीचा विचार करता चिंतेची बाब नाही. भारतात पाटा खेळपट्ट्यावर खेळण्याचा सराव असल्यामुळे इंग्लंडमध्ये नेहमीच आव्हानात्मक स्थिती असते. यावर तोडगा शोधण्यासाठी आमच्याकडे अद्याप वेळ आहे. चिंतेची कुठली बाब नसून आम्हाला चांगला खेळ करावा लागेल.’ जडेजा पुढे म्हणाला, ‘फलंदाजीचा विचार करता आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. संघातील खेळाडू अनुभवी असून चिंतेची बाब नाही.’
गोलंदाजीला अनुकूल स्थितीत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याबाबत जडेजा म्हणाला,‘परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आम्ही खडतर स्थितीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण जर आम्ही अशा स्थितीत खेळण्याचा सराव केला, तर स्पर्धेतील लढतीत खेळणे सोपे होईल. आम्ही आव्हान म्हणून येथे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आमची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, यात कुठली शंका नाही.’
जडेजाने ५० चेंडूंना सामोरे जाताना ५४ धावा केल्या. आपल्या फलंदाजीबाबत बोलताना जडेजा म्हणाला,‘आयपीएल स्पर्धेदरम्यान मी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. ज्यावेळी मला संधी मिळत होती त्यावेळी मी नेट््समध्ये मूळ तंत्र व फटक्यांची निवड याचा सराव करीत होतो.’ (वृत्तसंस्था)
Web Title: The hope of getting good pitches during the tournament - Jadeja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.