सानो : आशियाई स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मंगोलियाचा संघ बुधवारी जपानविरुद्ध केवळ १२ धावांत बाद झाला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही दुसरी नीचांकी धावसंख्या आहे. जपानने प्रथम फलंदाजी करताना सात बाद २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ अवघ्या ८.२ षटकांत बाद झाला.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नीचांकी धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम आइल ऑफ मॅन या संघाच्या नावावर आहे. हा संघ २६ फेब्रुवारी २०२३ ला स्पेनविरुद्ध १० धावांवर बाद झाला होता. जपानकडून १७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज काजुमा कातो स्टॅफोर्डने ३.२ षटकांत सात धावांत पाच गडी बाद केले.
अब्दुल समदने चार धावांत दोन गडी बाद केले तर मकोतो तानियामा याने शून्य धावांत दोन गडी बाद केले. मंगोलियाकडून तूर सुमायाने सर्वाधिक चार धावा केल्या. जपानने हा सामना २०५ धावांनी जिंकला. हा विजय टी-२० क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने चौथा मोठा विजय आहे. सर्वाधिक धावांच्या फरकाने विजयाचा विक्रम नेपाळच्या नावावर आहे. नेपाळने आशियाई स्पर्धेत मंगोलियाला २७३ धावांनी पराभूत केले होते.