Join us  

यजमान बांगलादेशचा न्यूझीलंडलादेखील धक्का; किवी संघ टी-२० मध्ये ६० धावांतच गारद

किवी संघ टी-२० मध्ये ६० धावांतच गारद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 8:35 AM

Open in App

ढाका : बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंडला मालिकेतील पहिल्याच सामन्यात १६.५ षटकांत सर्वबाद ६० धावांवर रोखत इतिहास घडवला आहे. त्यानंतर हा सामना बांगलादेशने सात गडी राखून जिंकला. बांगलादेशचा किवींवरील हा पहिलाच टी-२० विजय आहे. या आधीच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने ४-१ असे पराभूत केले होते. 

ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये बुधवारी हा सामना पार पडला. या दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे न्यूझीलंडला महाग पडले. न्यूझीलंडच्या संघाला २० षटकेदेखील पूर्ण खेळता आली नाही. ९ धावातच आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर टॉम लॅथम (१८) आणि हेन्री निकोल्स (१८) वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टी-२० असूनही या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने फक्त तीनच चौकार लगावले.

मुस्तफिजूर हा बांगलादेशचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी घेतले. तर नसूम अहमद, शकीब अल हसन आणि सैफुद्दीन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर मेहदी हसन याने एक बळी मिळवला. प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवातही अडखळतच झाली. मात्र शकीब अल हसन (२५ धावा), मुशिफिकूर रहिम नाबाद १६ आणि महमुदुल्लाह नाबाद १४ धावा यांनी संघाला विजय मिळवून दिला.  न्यूझीलंडच्या संघाने यासह संयुक्तपणे धावांची निचांकी गाठली आहे. या आधी श्रीलंकेने न्यूझीलंडला २०१४ मध्ये ६० धावांवर बाद केले होते.

संक्षिप्त धावफलक न्यूझीलंड  : १६.५ षटकांत सर्वबाद ६० धावा, टॉम लॅथम १८, हेन्री निकोल्स १८, गोलंदाजी -  मेहदी हसन १/१५, नसूम अहमद २/५, शकीब २/१०, मुस्तफिजूर ३/१३, सैफुद्दीन २/७

बांगलादेश : १५ षटकांत ३ बाद ६२ धावा, शकीब २५, मुशिफिकूर रहिम नाबाद १६, महमुदुल्लाह नाबाद १४, गोलंदाजी एजाज पटेल १/७, मॅकोनी १/१९, रचिन रवींद्र १/२१.

टॅग्स :बांगलादेशन्यूझीलंड
Open in App