सिडनी : रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर २ गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावापर्यंत मजल मारता आली होती. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणे (नाबाद ०४) व चेतेश्वर पुजारा (नाबाद ०९) खेळपट्टीवर होते.
दुसऱ्या डावात रोहित शर्मा (९८ चेंडू, ५२ धावा, ५ चौकार, १ षटकार) आणि शुभमन गिल (३१) हे भारतीय सलामीवीर तंबूत परतले आहे. भारतीय संघाला सोमवारी अखेरच्या दिवशी विजयासाठी ३०९ धावांची गरज असून ८ विकेट शिल्लक आहेत. सिडनीच्या असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियापुढे पराभव टाळण्याचे लक्ष्य आहे. कारण दुसऱ्या डावात दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा फलंदाजीला येण्याची शक्यता नाही.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या अपशब्दांना सामोरे जावे लागले. त्यामुळे खेळ १० मिनिटे थांबला, ऑस्ट्रेलियाने कॅमरन ग्रीन (१३२ चेंडू, ८४ धावा) याच्या आक्रमक अर्धशतका व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ (१६७ चेंडू, ८१ धावा) आणि मार्नस लाबुशेन (११८ चेंडू, ७३ धावा) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ६ बाद ३१२ धावांची मजल मारल्यानंतर दुसरा डाव घोषित केला. कर्णधार टीम पेनने ५२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ३९ धावा केल्या आणि ग्रीनसोबत सहाव्या विकेटसाठी २० पेक्षा कमी षटकांत १०४ धावांची भागीदारी केली.
भारताला सुमार क्षेत्ररक्षणाचा फटकाn भारताला सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. हनुमा विहारी, उपकर्णधार रोहित शर्मा व कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अनुक्रमे स्क्वेअर लेग, स्लिप व गलीमध्ये सोपे झेल सोडले.n लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला रोहित व गिल यांनी सलामीला ७१ धावांची भागीदारी करीत सावध सुरुवात करुन दिली. रोहितला वैयक्तिक १३ धावांवर असताना मैदानावरील पंचाने जोश हेजलवुडच्या गोलंदाजीवर पायचित दिले होते, पण फलंदाजाने डीआरएसचा अवलंब केल्यानंतर पंचाला निर्णय बदलावा लागला. n चेंडू यष्टीच्या वरुन जात असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. गिलने संथ सुरुवातीनंतर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दोन चौकार वसूल केले. संघाने १९ व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले.
n रोहितने मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन चौकार व ग्रीनच्या गोलंदाजीवर षटकार लगावला. हेजलवुडने गिलला बाद करीत भारताला पहिला धक्का दिला. n हेजलवुडच्या याच षटकात पुजाराला पंचानी पायचित दिले होते, पण डीआरएसमुळे हा निर्णय बदलावा लागला. रोहितने लियोनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले, पण पुढच्याच षटकात कमिन्सच्या गोलंदाजीवर पुलचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो स्टार्ककडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर रहाणे व पुजारा यांनी दिवसअखेर सावध फलंदाजी केली. n त्याआधी, सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने ७९ धावांची भर घातली. भारतातर्फे दुसऱ्या डावात सैनी व अश्विनने प्रत्येकी २ तर बुमराह व सिराज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.