कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असताना तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने खराब कामगिरी केली. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २२३ धावांवर आटोपला. भारताच्या भरवशाच्या फलंदाजांनी चाहत्यांची साफ निराशा केली. राहुल, मयंक, पुजारा, रहाणे आणि पंत यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. अश्विन आणि शार्दूल या दोन अष्टपैलू खेळाडूंनीही निराशा केली. केवळ कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देत संयमी अर्धशतक ठोकलं. त्याच्या ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने द्विशतकी मजल मारली. विराटने आपल्या चुकांमधून धडा घेत चांगली फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लिश माजी क्रिकेटपटू इसा गुहाने विराटच्या खेळीचं कौतुक केलं.
विराट कोहली दोन गडी बाद झाल्यानंतर मैदानात आला. त्यावेळी संघाची धावसंख्या २ बाद ३३ होती. तेथून विराटने एकाकी झुंज देण्यास सुरूवात केली. पुजारा, रहाणे, पंत, अश्विन आणि शार्दूल ठाकूर या फलंदाजांनी विराटला अपेक्षित साथ दिली नाही. पण विराटने धीर सोडला नाही. त्याने तब्बल २०१ चेंडूंचा सामना केला आणि अप्रतिम अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीवर माजी इंग्लिश महिला क्रिकेटपटू फिदा झाली. तिने ट्वीट करत विराटच्या खेळीचं कौतुक केलं. 'विराट कोहली फलंदाजी करत असताना सामना पाहायला मजा येते. विराट कोहली क्रिकेट खेळतो हे कसोटी क्रिकेटचं भाग्यच आहे', अशा शब्दांत तिने विराटची स्तुती केली.
दरम्यान, विराटने तिसऱ्या कसोटी आपल्या चुकांमधून धडा घेत खेळ सुधारला. विराट कोहली पहिल्या कसोटीत चांगली सुरूवात मिळाल्यानंतर बाद झाला होता. दोन्ही वेळी त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर आलेल्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो झेलबाद झाला होता. तोच प्लॅन तिसऱ्या सामन्यातही आफ्रिकन गोलंदाजांनी त्याच्या विरोधात वापरला, पण विराटने योग्य तेच चेंडू खेळले आणि बाकीचे चेंडू थेट सोडून दिले.