अहमदाबाद : भारतात वन डे विश्वचषकाचा थरार ५ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. यातील भारत आणि पाकिस्तान या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सामन्याच्या निमित्ताने येथील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या असून, अशा परिस्थितीत चाहत्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली. स्वस्तात राहण्यासाठी लोकांनी चक्क हॉस्पिटलमध्ये बेड बुक करणे सुरू केले आहे.
हॉस्पिटलचे भाडे हॉटेलच्या किमतीपेक्षा कमी आहे. आयसीसीने या सामन्याची तारीख जाहीर केल्यापासून अहमदाबादला हॉटेल बुकिंग सुरू झाले होते. संधीचा फायदा घेत हॉटेलचालकांनी दर वाढवले. अहमदाबादमध्ये सध्या सामन्याच्या तारखेसाठी किंवा आसपासच्या दिवसाचे बुकिंग सुमारे ५० हजार रुपये एवढे आहे. त्यामुळे आता लोकांनी रुग्णालयात बेड बुक करण्यास सुरुवात केली. यासाठी रुग्णालय चालकांनी एक रात्र किंवा दिवसाचे पॅकेजही तयार केले आहे. हॉटेल्समध्ये सुमारे ५० हजार रुपये खर्च करण्याऐवजी आता हॉस्पिटलमध्ये ३ हजार ते २५ हजार रुपयांना बेड बुक केले जात आहेत. विशेष म्हणजे, स्टेडियमच्या आजूबाजूला बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्वच खोल्या आरक्षित झालेल्या आहेत.
एका खासगी रुग्णालयाचे संचालक डॉ. पसार शाह यांनी सांगितले की, ‘हे हॉस्पिटल असल्याने, क्रिकेट चाहते संपूर्ण बॉडी चेकअपसह रात्रभर मुक्काम करण्याची मागणी करीत आहेत. यानिमित्ताने येणाऱ्यांना रात्रीचा मुक्काम करता येईल. सोबत त्यांच्या शरीराची तपासणीही होईल आणि पैशांचीही बचत होईल. डॉक्टर निखिल लाल यांनी सांगितले की, १५ ऑक्टोबरच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये २४ ते ४८ तास राहण्यासाठी बरीच चौकशी केली जात आहे. कारण, आमच्याकडे बॉडी चेकअपचे पॅकेज आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामना पाहण्यासह अशा पद्धतीने चाहते स्वत:च्या निवासाची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहेत.
हॉस्पिटल्समध्ये वास्तव्य करणाऱ्यांना बिल दिले जाईल का, हा खरा प्रश्न आहे. कारण, सामना पाहण्यावर होणारा खर्च वसूल करण्यासाठी अनेक जण आरोग्य विम्याचा वापर करू शकतात. अनेक कंपन्यांकडून कॅशलेस विमा काढणाऱ्यांनी खर्च वसुलीची अशी शक्कल लढविल्यास आश्चर्य वाटू नये.विविध शहरांतून येथे येणारे चाहते विमानाचे महागडे तिकीट, भोजनावर होणारा खर्च आणि निवासासाठी हॉस्पिटल्सचा जुगाड करतील. यावर बरीच रक्कम खर्च होईल. ही रक्कम वसूल करण्यासाठी हॉस्पिटल्स व्यवस्थापनाला हाताशी धरून खर्चाची भरपाई कशी होईल, याचा विचार करीत असावेत.विमा रकमेचा दावा करण्यासाठी किमान २४ तास इस्पितळात राहणे बंधनकारक आहे. अशावेळी क्रिकेट चाहते ४८ तास वास्तव्य दाखवून विमा कंपन्यांकडे दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.