कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहे. पण कालांतराने तिचे चारीत्र्य लोकांपुढे येत असून त्यामुळे तिचा रागाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. कोलकात्यामध्ये काही पत्रकारांबरोबर हसीनने गैरव्यवहार केला असल्याचे समोर येत आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
हसीन आज दंडाधिकाऱ्यांपुढे आपली बाजी मांडणार होती. त्यामुळे तिच्याकडून माध्यमांना माहिती हवी होती. हसीन सेंट जोसेफ शाळेमध्ये असल्याचे समजल्यामुळे प्रसारमाध्यमांनी तिथे धाव घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांवर ती चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर बोलताना हसीनची भाषा फारशी चांगली नव्हती. प्रतिनिधींवर यावेळी ती चांगलीच बरसली. त्यानंतर तिने एका वाहिनीचा कॅमेरा पकडला आणि जमिनीवर भिरकावून दिला. तिचे हे रुप पाहून साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. कॅमेरा फोडल्यावर हसीन जास्त काळ तिथे थांबली नाही. त्यानंतर ती थेट आपल्या गाडीत जाऊन बसली आणि तिथून निघून गेली.