जयपूर : राजस्थानविरुद्ध गुरुवारी ‘सीएसके’ला ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेला अंबाती रायुडू हा दोन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. यामुळे दिग्गज सुनील गावसकर यांनी रायुडूचा ‘क्लास’ घेतला. शिवाय ‘इम्पॅक्ट प्लेअर’च्या नियमावरही बोट ठेवले.रायुडू बाद होताच समालोचन करणारे गावसकर म्हणाले, ‘तुम्ही क्षेत्ररक्षणाला आला नाहीत, मग फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. क्षेत्ररक्षणादरम्यान मैदानावर पाय ठेवणार नसाल तर फलंदाजीचाही अधिकार गमावीत आहात.’
२०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ‘सीएसके’ने रायुडूला चौथ्या स्थानावर पाठविले होते. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचे दोन चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर स्वीप शाॅट खेळण्याच्या नादात रायुडू मिड विकेटला झेलबाद झाला. रायडूने २०२३ च्या सत्रात आठ सामन्यांत १६.६० च्या सरासरीने ८३ धावा केल्या. १४ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्याची ही सर्वांत कमी धावसंख्या आहे. ‘सीएसके’ने त्याला यंदा फलंदाज किंवा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापरले. डावखुरा वेगवान गोलंदाज आकाशसिंग याच्याविरुद्ध तो धावा काढू शकेल,’ असा अंदाज राखून रायुडूला धोनीने संधी दिली असावी.
रायुडूचा नकोसा विक्रमराजस्थानविरुद्ध चेन्नईचा फलंदाज अंबाती रायुडूने नकोशा विक्रमाची नोंद केली. आयपीएलमध्ये धावबाद होण्याची ही रायुडूची १४ वी वेळ होती. यासह त्याने सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीच्या ए. बी. डिविलियर्सची बरोबरी केली. सुरेश रैना या बाबतीत रायुडूच्याही पुढे असून, तो १५ वेळा धावबाद झाला तर शिखर धवन आणि गौतम गंभीर सर्वाधिक १६ वेळा धावबाद झाले आहेत.