अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
आयपीएल २०२४ च्या खराब कामगिरीनंतर फिटनेस आणि निर्णयक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही अष्टपैलू हार्दिक पांड्या याने टी-२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली. भारताच्या जेतेपदात त्याने मोठे योगदान दिले. जेतेपदानंतर कर्णधार रोहित शर्मा याने या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तेव्हा उपकर्णधारपदाची जबाबदारी निभावणाऱ्या हार्दिककडे ही जबाबदारी सोपविली जाईल, असे सहज वाटले होते. पण श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा चित्र बदलले होते. कथानकाला अचानक ट्विस्ट आले.
हार्दिकला टी-२० संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले नाहीच, शिवाय त्याच्याकडून उपकर्णधारपदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली. कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली. सूर्या आयपीएलमध्ये हार्दिकच्याच नेतृत्वाखाली खेळला आहे. सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे टी-२० आणि वनडे संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्यानंतर हार्दिक पांड्या हा तिन्ही प्रकारात खेळण्याची क्षमता बाळगतो. त्याचवेळी सतत दुखापतग्रस्त होत गेल्यामुळे हार्दिकच्या कारकिर्दीला खीळ बसत गेली. जखमेमुळे त्याने स्वतःला कसोटीपासून वेगळे केले. वनडे आणि टी-२० वर त्याचा फोकस आहे. अधूनमधून रोहितच्या अनुपस्थितीत त्याने नेतृत्वही सांभाळले आहे.
अदलाबदलीचा काळ...
यादरम्यान वनडे विश्वचषकात तो पुन्हा जखमी झाला. त्यामुळे संघाबाहेर बसला. तेव्हापासून बदल सुरू झाले आहेत. आयपीएलमध्ये गुजरातला पाठ दाखवून हार्दिक मुंबई संघात दाखल झाला. रोहितला वगळून त्याला कर्णधारपद सोपविण्यात आले. यावर टीकेची झोड उठली. आयपीएलमध्ये मुंबईने दारुण कामगिरी केली. पांड्याचे नेतृत्व पुन्हा एकदा वादात सापडले. त्याचवेळी अनेकांना भीती वाटू लागली की, हार्दिकला टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान मिळणार का? पण स्थान मिळाले आणि हार्दिकने अपेक्षेपेक्षा अधिक सरस कामगिरी करीत टीकाकारांची बोलती बंद केली. याच कारणांमुळे रोहितच्या निवृत्तीनंतर टी-२० प्रकारात तो कर्णधारपदाचा दावेदार बनला होता.
दुहेरी आघात
हार्दिकसाठी हा दुहेरी धक्का ठरला. कर्णधारपद मिळाले नाहीच; पण उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टी-२० संघात हार्दिक आहे, त्याचवेळी वनडेतून त्याने विश्रांतीची विनंती केली होती. निवड समितीने ती मान्य केली. हार्दिकला टी- २० चे नेतृत्व का सोपविण्यात आले नसावे? फिटनेस चांगला नसल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली नसावी का? मुख्य कोच गौतम गंभीर यांना हार्दिकचे नेतृत्व पसंत नव्हते? फिटनेसचे कारण समजू शकतो, पण प्रशिक्षकाच्या इशाऱ्यावरून कर्णधाराची नियुक्ती व्हावी, इतके ताकदवान पद भारतीय प्रशिक्षकाचे नाही. कर्णधार आणि प्रशिक्षकाची नेमणूक बीसीसीआयची राष्ट्रीय निवड समिती करते. याचा अर्थ गंभीर यांनीच हार्दिकला नेतृत्वापासून लांब ठेवले असे म्हणणे तर्कसंगत होणार नाही. हे खरे असू शकते की कर्णधारपदाबाबत गंभीर यांनी आपले मत नक्कीच नोंदविले असावे. पूर्ण फिटनेस मिळविलेल्या खेळाडूंचीच मला गरज आहे, असे गंभीर यांनी स्पष्ट केले असावे. संघात शिस्त आणण्यासाठी हे गरजेचे आहेच.
गंभीरसोबत काय चर्चा झाली?
निवड समितीने गौतम गंभीर यांच्याशी त्याच्या पुढील तीन वर्षातील योजनांवर चर्चा केली असेलच. चॅम्पियन्स ट्रॉफी, विश्व कसोटी चॅम्पियनशिप, २०२६ चा टी-२० विश्वचषक, २०२७ चा वनडे विश्वचषक या योजनांविषयी खलबते झाली असावी. गंभीर यांचे व्हिजन निवडकर्त्यांनी जाणून घेतले असावे.
Web Title: How did Hardik lose even the vice-captaincy in the leadership race? team india selection
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.