कॅनडा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंगनेकॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत त्यानं टोरोंटो नॅशनल संघाचे नेतृत्व सांभाळले होते आणि त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये युवीच्या टोरोंटो नॅशनल संघाला 7 सामन्यांत केवळ 3 विजय मिळता आले. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीतून ते बाहेर पडले. पण, या लीगच्या अंतिम सामना थरारक झाला. सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या या सामन्यात विनिपेग हॉव्क्स संघाने बाजी मारली. या लीगमधील युवीच्या कामगिरीबद्दल आणि अंतिम सामन्यातील थराराबद्दल चला जाणून घेऊया...
या लीगमध्ये खेळवलेल्या 22 सामन्यांत 6759 धावांचा पाऊस पडला, तर 233 विकेट्स घेण्यात गोलंदाजांना यश आले. तब्बल 525 चौकार व 399 षटकार खेचले गेले. सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप पाच फलंदाजांत जेपी ड्यूमिनी ( 332), हेनरीच क्लासेन ( 326), शैमान अनवर ( 296), ख्रिस लीन ( 295) आणि रॉड्रीगो थॉमस ( 291) यांनी स्थान पटकावले. युवराज या क्रमवारीत 16व्या स्थानी राहिला. त्यानं दुखापतीमुळे एक सामना कमी खेळला. त्यानं 6 सामन्यांत 145.71च्या स्ट्राईक रेटने 153 धावा केल्या. त्यात 51 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानं 11 चौकार व 10 षटकार मारले. गोलंदाजीतही त्याला 2 विकेट्स घेता आल्या.