होबार्ट : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची कामगिरी काही फार चांगली होताना दिसत नाही. त्यांना सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतही तसेच चित्र आहे. त्यांना आगामी मालिकेत जगातील अव्वल खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा सामना करायचा आहे. सततच्या अपयशामुळे आमच्या खेळाडूंचे मनोबल खचले असून भारतीय संघाचा सामना कसा करावा, हा प्रश्न ऑस्ट्रेलियाचा वन डे संघाचा कर्णधार ॲरोन फिंचला पडला आहे.
तो म्हणाला,"पराभवामुळे आम्ही प्रचंड दबावाखाली आलो आहोत. माझ्यासह अन्य फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी होत नाहीये. ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस लिन, ट्रॅव्हिस हेड, मी किंवा मार्कस स्टोइन आम्हा सर्वांना अपयश येत आहे. आगामी मालिकेच्या दृष्टीने याचा विचार प्रत्येकाने करायला हवा."
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघाने फलंदाजीतील समतोल साधायला हवा असे फिंचला वाटते. " केवळ समतोल संघ नाही तर पुढील दोन महिने सातत्यपूर्ण कामगिरी करायला हवी. त्यासाठी रणनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे," असे तो म्हणाला.