मुंबई : प्रत्येक गोष्टींमध्ये कालानुरुप बदल होत असतात. क्रिकेटही त्याला अपवाद नाही. जेव्हा क्रिकेट सुरु झाले तेव्हापासून बरेच बदल झाले आहेत. पण क्रिकेटला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा एका चेंडूवर पाच धावाही मिळत होत्या. त्या पाच धावा कशा मिळायच्या, हे तुम्हाला माहिती आहे का...
1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना खेळवला गेला. पण पहिला षटकार पाहायला चाहत्यांना तब्बल 21 वर्षे वाट पाहावी लागली होती. 1898 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये अॅडलेडवर कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या जो डार्लिंगने 178 धावांची दमदार खेळी साकारली होती. या खेळीमध्ये डार्लिंग यांनी क्रिकेट जगताला पहिला षटकार दाखवला होता. या खेळीमध्ये डार्लिंग यांनी 26 चौकार आणि तीन षटकार लगावले होते.
पहिला षटकार लागायला तब्बल 21 वर्षे का लागली, हा विचार तुम्ही करत असाल. कारण त्यावेळी क्रिकेटमधले नियम वेगळे होते. जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जायचा तेव्हाच षटकार दिला जायचा. पण जेव्हा चेंडू थेट सीमारेषेच्या पार व्हायचा तेव्हा पाच धावा दिल्या जायच्या.