ठळक मुद्दे२०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप,२०११ चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार
भारतीयांना क्रिकेटचे वेड लावणारा सचिन तेंडुलकर नेहमी सांगायचा स्वप्न पाहा आणि त्यांचा पाठलाग करा, स्वप्न नक्की पूर्ण होतात... तेंडुलकरचे हे वाक्य जणू महेंद्रसिंग धोनीनं मनावर कोरलं आणि निघाला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला...
सामान्य कुटुंबात जन्मलेला. एक सरकारी नोकरी मिळवून लाईफ सेट, एवढीच त्याच्या वडिलांची माहीकडून अपेक्षा. वडीलांच्या अपेक्षांचं ओझं आणि दुसरीकडे स्वप्न; या चक्रव्यूहात माही काहीकाळ अडकला, पंरतु तो तोडलाही त्यानेच. आंतरराष्ट्रीय संघात स्थान पटकावण्यासाठी त्यानं झोकून मेहनत घेतली. त्याचं फळ त्याला मिळालं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा तारा उदयास आला. 2004मध्ये वन डे आणि 2005मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर 2006मध्ये ट्वेंटी-20त पदार्पण.
२००७ मध्ये धोनीनं भारताला पहिलावहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला. प्रतिस्पर्धी संघानं विचारही केला नसेल असे डावपेच खेळून टीम इंडियाला अनेक अविस्मरणीय विजय धोनीनं मिळवून दिले. २००३ च्या वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील टीम इंडियाचा पराभव टीव्हीसमोर बसून पाहताना, आपण कधी तरी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देऊ असा विचार त्यानं कधी केला नसावा.
त्यानं स्वप्न पाहिले नाही, तर ते पूर्ण केले. २००७ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप,२०११ चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार. आकड्यांच्या मापात धोनीची गुणवत्ता मोजता येण्यासारखी नाही. त्यामुळेच तो जगातील सर्वोत्तम कर्णधार, सर्वोत्तम यष्टिरक्षक आणि सर्वोत्तम मॅच फिनीशर आहे.
काहींच्या मते त्याने राजकारण खेळून संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर केले. पण, उगवत्या सूर्याला मावळावे लागते; हा सृष्टीचा नियम कदाचित टीका करणारे विसरले. धोनीच्या हाती टीम इंडियाची सत्ता आली तेव्हा संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या कारकिर्दीचा उतरता काळ होता आणि त्यावेळी संघाच्या हिताचे पण कठोर वाटणारे निर्णय घेणे भाग होते. धोनीने ते घेतले, इतकेच.
त्या निर्णयांचा संघाला फायदाच झाला आणि आज टीम इंडिया कोणत्याही देशाला त्यांच्या घरात जाऊन आव्हान देत आहे. सौरव गांगुलीच्या लढाऊ बाण्याचा वसा धोनीनं पुढे चालवला. पण, त्याच्या संयमी आणि कल्पक नेतृत्वशैलीनं. 14-15 वर्ष टीम इंडियाची सेवा करणाऱ्या धोनीच्या कारकिर्दीचा उतरता काळ समीप आला आहे.. म्हणूनच त्याच्या निवृत्तीच्या चर्चा गेली दोनेक वर्ष सुरू आहेत.
वैयक्तिक आणि क्रिकेटच्या मैदानावर आलेल्या प्रत्येक बाऊन्सरचा धोनीनं परिस्थितीनुसार सामना केला. कधी तो बाऊन्सर खेळण्याचा मोह आवरला, तर कधी सीमापार पाठवला. असाच एक बाऊन्सर सध्या धोनीवर आदळत आहे. तो त्याकडे दुर्लक्ष करतोय.. पण असं किती काळ?
२०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. रिषभ पंतकडे त्याचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. पण, पंत विश्वासावर खरा उतरलेला नाही आणि आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पाहता धोनी असणे संघासाठी फायद्याचे आहे. पण, कोरोना व्हायरसच्या संकटात वर्ल्ड कप होईल की नाही हेही निश्चित नाही. धोनी इंडियन प्रीमिअर लीगमधून टीम इंडियात कमबॅक करेल असा कयास होता, परंतु आयपीएलच्या मावळलेल्या आशेनं धोनीच भवितव्यही धोक्यात आले आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये धोनीला फ्युचर प्लानबाबत विचारल्यास जानेवारीपर्यंत विचारू नका असं धोनी म्हणाला होता. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च गेलं आणि आता कोरोनामुळे एप्रिल, मे आणखी किती महिने जातील याचा अंदाज नाही. म्हणून धोनीनं निवृत्ती जाहीर करावी असा आमचा अट्टाहास नाही. पण धोनी अजून किती काळ हा प्रश्न टाळत राहील? त्यानं कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या काळात भविष्याचा विचार करून जे निर्णय घेतले, तेच आता विराट कोहलीला धोनीसाठी घ्यावे लागतील.
राहुल द्रविड, अनिल कुंबळे, युवराज सिंग आदी दिग्गजांना मैदानावर निवृत्ती जाहीर करता आली नाही. ती वेळ धोनीवर येऊ नये ही इच्छा!!!
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
Web Title: How many more days will MS Dhoni avoid talking about retirement? svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.