Join us

कोहली आणखी किती वर्षं खेळणार अन् किती शतकं ठोकणार? सिद्धूंनी केली मोठी भविष्यवाणी

माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी कोहलीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, कोहलीपेक्षा अधिक शतके केवळ सचिन तेंडुलकरच्याच नावे आहेत. त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 20:40 IST

Open in App

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानसोबत खेळताना जबरदस्त खेळी केली. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने दुबईच्या मैदानावर पाकिस्तानला ६ विकेट्सनी पराभूत केले. कोहलीने १११ चेंडूत सात चौकारांसह नाबाद १०० धावा केल्या. या सामन्यात भारताने ४२.३ षटकांतच २४२ धावांचे लक्ष्य गाठले. ३६ वर्षीय कोहलीने १५ महिन्यांनंतर हे एकदिवसीय क्रिकेटमधील शतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ५१ वे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८२ वे शतक होते. यानंतर आता माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी कोहलीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, कोहलीपेक्षा अधिक शतके केवळ सचिन तेंडुलकरच्याच नावे आहेत. त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.

काय म्हणाले सिद्धू -जिओ हॉटस्टारवर कोहलीचे कौतुक करताना सिद्धू म्हणाले, "चरित्र संकटात निर्माण होत नाही, तर ते प्रदर्शित होत असते. या माणसात (विराट कोहली) जन्मजातच तो क्लास आहे आणि जिद्द आहे. त्याच्या या शतकानंतर, मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की, हा माणूस आणखी २-३ वर्षे खेळत राहील आणि आणखी १०-१५ शतके ठोकेल. मी आपल्याला याची हमी देऊ शकतो. आपण बघा, कुठल्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठी परीक्षा असते की, ती संकटांचा सामना कसा करते? ते संकट ती व्यक्ती कशा पद्धतीने स्वीकारते. गेल्या सहा महिन्यांत कोहलीसोबत बरेच काही घडले आहे, याची बरीच चर्चाही झाली. आता त्याने पाकिस्तान विरुद्ध केलेली विजयी खेळी लोक १० वर्षे विसरणार नाहीत." 

'विराट कोहली कोहिनूर प्रमाणे आहे' -सुद्धू पुढे म्हणाले, “हे बघा, जेव्हा तुम्ही विराट कोहलीचे खेळाडू म्हणून मूल्यांकन करता तेव्हा त्याचा ट्रेडमार्क जाणून घेणे महत्त्वाचे असते. सचिन तेंडुलकरकडे बघितले तर तो नेहमीच बॅकफूटवर जाऊन प्रहार करतो. गावस्कर बघा, स्ट्रेट ड्राईव्ह. जेव्हा तुम्ही विराट कोहलीकडे पाहता, तेव्हा तो कव्हर ड्राइव्ह खेळतो आणि तो जेव्हा आपले डोके चेंडूच्या वर नेऊन सुंदर कव्हर ड्राइव्ह करतो, तेव्हा आपल्याला समजते की, तो फॉर्मात आला आहे. तो (कोहली) रस्त्यावरील मुलांना प्रेरणा देणारा आहे. तो 'कोहिनूर'प्रमाणे आहे. 

टॅग्स :विराट कोहलीनवज्योतसिंग सिद्धूभारतीय क्रिकेट संघ