Rohit Sharma, Team India Captain : भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने (Virat Kohli) राजीनामा दिल्यानंतर आधी टी२० मग वन डे आणि त्यानंतर कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी रोहित शर्माला देण्यात आली. गेली आठ वर्षे रोहित मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत असताना त्याने संघाला पाच विजेतेपदं जिंकून दिली आहेत. त्यामुळे भारतीय निवड समितीच्या या निर्णयाचे साऱ्यांनीच स्वागत केले. पण भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने रोहितच्या निवडीवरून काही सवाल उपस्थित केले आहेत.
"रोहित हा एक प्रतिभावान कर्णधार आहे यात वादच नाही. त्याने तिसऱ्या टी२० सामन्यात कर्णधारपदाबाबतच्या काही महत्त्वाच्या पैलूंचं दर्शनही चाहत्यांना घडवलं आहे. रोहित हा सामना सुरू असताना पुढचा विचार करणारा असा कर्णधार आहे. त्याने सर्व गोलंदाज नीट विचारपूर्वक वापरले आणि योग्य वेळी आवेश खानला गोलंदाजी दिली. शार्दुलने पहिल्या षटकात १८ धावा दिल्या होत्या. पण त्याला योग्य वेळी थांबवून आणि नंतर पुन्हा गोलंदाजी देऊन ३३ धावांत ४ गडी बाद करण्याइतकं सक्षम ठेवलं. तो गोलंदाजांना समजून घेतो आणि त्यानुसार योजना आखतो. पण खरा प्रश्न हा आहे की रोहित शर्मा आणखी कितीसं क्रिकेट खेळू शकणार आहे?", असं रोखठोक मत कार्तिकने व्यक्त केलं.
"रोहित शर्मा हा खेळ समजून त्यानुसार नेतृत्व करणारा क्रिकेटपटू आणि कर्णधार आहे. योजना आखण्यात त्याचा हातखंडा आहे. आता तो तिन्ही फॉरमॅटमध्ये जितकं क्रिकेट खेळेल त्यावरून समजू शकेल की तो आपल्या कामगिरीत किती सातत्य राखू शकतो. आता जो अशा परिस्थितीत कर्णधार झाला आहे, ज्या वेळी वर्षभर खूप क्रिकेट सामने खेळले जाणार आहेत. त्यामुळे रोहितसाठी हे एक मोठं आव्हानच असेल", असं कार्तिकने नमूद केलं.