भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १० विकेट्स व २६३ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवरील ही मॅच दोन तासांत संपली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ १५.१ षटकांत ५० धावांत तंबूत पाठवल्यानंतर भारताने ६.१ षटकांत एकही विकेट न गमावता ५१ धावा करून बाजी मारली. मोहम्मद सिराजने त्याच्या कारकीर्दितील सर्वोत्तम गोलंदाजी करताना २१ धावांत ६ विकेट्स घेतल्या. त्यासाठी त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानो गौरविण्यात आले. सिराजने त्याला मिळालेली बक्षीस रक्कम कोलंबो स्टेडियम्सच्या ग्राऊंड्समन्सना दिली. भारतीय संघालाही जेतेपदानंतर मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली...
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासमोर तगडे लक्ष्य उभं करण्याचा त्यांचा मानस होता. पण, जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात धक्का दिला आणि त्यानंतर सिराजने अप्रतिम गोलंदाजी करून त्यांचे कंबरडे मोडले. सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिक पांड्याने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली. इशान किशन व शुबमन गिल ही युवा जोडीने ६.१ षटकांत मॅच संपवली. इशान १७ चेंडूंत २२ धावांवर नाबाद राहिला, तर गिलनेही १९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. रोहित शर्माने या जेतेपदासह इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर आशिया चषक दोन वेळा उंचावणारा तो तिसरा कर्णधार ठरला. २०१८मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितने आशिया चषकात नेतृत्व सांभाळले होते. या स्पर्धेचे खरे यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) होते, परंतु BCCI ने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने फायनलसह ९ सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले.
या विजयानंतर भारतीय संघाला ACC चे अध्यक्ष जय शाह यांच्याहस्ते ट्रॉफी दिली गेली, तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी तगड्या रकमेचा चेक दिला. रोहित शर्माला १५०००० अमेरिकन डॉलरचा हा चेक मिळाला. यानुसार भारतीय संघाला १ कोटी, २४ लाख, ६३ हजार ५५२.५० रुपये बक्षीस रक्कम म्हणून मिळाली.
विजेता - भारत - 1.25 कोटी रुपयेउपविजेता - श्रीलंका - 82 लाख रुपयेतिसरे स्थान - बांग्लादेश - 51 लाख रुपयेचौथे स्थान - पाकिस्तान - 25 लाख रुपये पाचवे स्थान - अफगाणिस्तान- 10 लाख रुपयेसहावे स्थान - नेपाळ - 10 लाख रुपये