- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)
भारताने न्यूझीलंडविरुध्दचा अखेरचा सामना थोड्याशा फरकाने, पण अत्यंत शानदार पध्दतीने जिंकला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली कामगिरी केली, परंतु थोडक्यात ते अपयशी ठरली. त्यामुळेच मला त्यांचा संघ खूप जबरदस्त वाटतो. गेल्या वर्षीही त्यांचा भारतात पराभव झाला होता, पण त्यावेळीही त्यांनी अखेरच्या सामन्यापर्यंत भारताला झुंजवले होते. यावेळीही तशीच कामगिरी त्यांनी केली. भारतासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन शतकवीर विजयाचे शिल्पकार ठरले. पहिल्या दोन सामन्यांत झगडताना दिसलेला रोहित तिसºया सामन्यात जबरदस्त खेळला. जेव्हा रोहित फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याच्याहून शानदार क्वचितंच कोणी इतर फलंदाज असतो. त्यामुळे मला वाटत की कोहली शिवाय एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम आमला रोहितला टक्कर देऊ शकतात. तसेच, या दोन शतकवीरांसह विजयाचे श्रेय भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांनाही द्यायला पाहिजे.एकवेळ न्यूझीलंडचा सहज विजय दिसत होता. अशावेळी डेथ ओव्हर्समध्ये या दोघांनी अप्रतिम मारा करत सामना भारताकडे झुकवला. विशेष म्हणजे सामन्यात भुवी काहीसा महागडा ठरला खरा, पण बुमराहने ज्याप्रकारे जबाबदारी घेतली, ते अप्रतिम होते. त्यामुळेच अनेकांचे मत आहे की कसोटी सामन्यांतही बुमराहला एक संधी द्यायला पाहिजे. यावर कोहली आणि रवी शास्त्री यांचे काय मत आहे, याची मला कल्पना नाही. पण, मलाही वाटते की बुमराहला एकदा कसोटी सामन्याची संधी द्यायला हवी.विराट कोहलीविषयी जितकं बोलू तेवढं कमी आहे. एकदिवसीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा दर्जा नक्की कोणत्या स्तराचा आहे याचा प्रश्न कायम पडतो. कधी कधी वाटते की तो सचिन तेंडुलकर आणि विव्ह रिचडर््स यांच्याही पुढचा खेळाडू बनला आहे का? पण एक मान्य करावे लागेल की, कोहलीने आपला एक दर्जा बनवला आहे.मला खात्री आहे की सर्वकालीन अव्वल ५ स्थानांमध्ये तर तो नक्कीच आला आहे. त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये ३२ वे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने केवळ धावा किंवा शतके उभारली नसून ज्याप्रकारे त्याने धावांचा पाठलाग केला आहे, ते सध्याच्या आधुनिक क्रिकेटमधील आश्चर्यच आहे असे म्हणावे लागेल. कारण कोणतेही लक्ष्य, परिस्थिती त्याच्यासाठी कठिण नसते. इंग्लंड, आॅस्टेÑलिया, श्रीलंका, भारत जिथे जिथे तो खेळला तिथे तिथे त्याने धावा काढल्या आहेत. त्याशिवाय त्याचा जोश अप्रतिम आहे. त्यामुळेच त्याने मालिकेआधी सांगितलेले की, खेळाडूंवर अतिरिक्त खेळण्याचा दबाव वाढत आहे, हे मला कुठेतरी पटत आहे. यावर नक्कीच विचार केले गेले पाहिजे. आता आगामी श्रीलंकेविरुध्दच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत तो खेळणार नसल्याची शक्यता दिसत आहे आणि यासाठी मी त्याच्याशी पूर्ण सहमतही आहे.