Join us

BCCI चा हा नियम पृथ्वी शॉच्या फायद्याचा; अनसोल्ड खेळाडूची कशी होऊ शकते IPL मध्ये एन्ट्री?

आयपीएलच्या मागील २ हंगामात प्रत्येकी ८-८ कोटी कमाई करणाऱ्या पृथ्वी शॉनं आपली किंमत कमी केली. पण ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:53 IST

Open in App

How Prithvi Shaw Can Still Play IPL 2025 After  Unsold In Mega Auction: आयपीएल २०२५ च्या हंगामात अनेक स्टार खेळाडूंना मोठा धक्का बसला. काही खेळाडू असे आहेत ज्यांच्यावर कोणत्याही फ्रँचायझी संघाने बोली लावण्याचे धाडस केले नाही. त्यातील एक नाव म्हणजे पृथ्वी शॉ. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा हा युवा सलामीवीर बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही मुंबईच्या संघात त्याचे स्थान डळमळीत झाल्याचे पाहायला मिळाले. अन् या सर्वाचा फटका त्याला आयपीएलच्या मेगा लिलावात बसला.

पृथ्वीनं किंमत कमी केली, तरी त्याच्यावर डाव खेळण्याची कुणी हिंमत नाही दाखवली

गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून डावाला सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉनं सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडलेल्या मेगा लिलावात अवघ्या ७५ लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. आयपीएलच्या मागील २ हंगामात प्रत्येकी ८-८ कोटी कमाई करणाऱ्या पृथ्वी शॉनं आपली किंमत कमी केली. पण तरीही त्याच्यावर डाव लावण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. पृथ्वीवर ही वेळ येण्यागची अनेक कारण आहेत. तो एक वेगळा मुद्दा आहे. पण इथं आपण अनसोल्ड राहिल्यानंतरही तो आयपीएल कसा खेळू शकतो? काय आहे बीसीसीआयचा अनसोल्ड खेळाडूंसदर्भातील तो नियम ज्याच्यामुळे त्याची IPL मध्ये एन्ट्री होऊ शकते त्यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात...

BCCI चा नियमामुळे मिळू शकते एक शेवटची संधी, पण

बीसीसीआयची आयपीएल स्पर्धेसंदर्भात जी नियमावली आहे त्यात अनसोल्ड खेळाडूला पुन्हा एक संधी मिळण्याचीही तरतूद आहे. आयपीएलमधील सहभागी संघातील एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला अन् त्याने आयपीएलमधून माघार घेतली तर ती जागा भरून काढण्यासाठी अनसोल्ड खेळाडूला ताफ्यात घेता येऊ शकते. याआधी काही खेळाडूंची अशी एन्ट्री झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. 

 नियमात बसण्यासाठी ही अट महत्त्वाची

आयपीएल सुरु होण्याआधी किंवा स्पर्धेदरम्यान एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर बदली खेळाडूच्या रुपात आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूला संधी मिळू शकते. पण यासाठी एक अटही आहे. जो खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे त्याच प्राइज टॅगच्या खेळाडूला फ्रँचायझी संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतो. उदा. १ कोटीमध्ये खरेदी केलेल्या खेळाडूचा बदली खेळाडू हा त्यापेक्षा कमी प्राइज टॅग असला तरी चालेल. पण अधिक प्राइज टॅगवाला नसावा, या अटीची पूर्तता करावी लागते. हा नियम फक्त पृथ्वी शॉसाठीच नाही तर अनसोल्ड राहिलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी आहे. हा एकच मार्ग  युवा बॅटरला IPL मध्ये एन्ट्री मिळवून देऊ शकतो. 

टॅग्स :पृथ्वी शॉआयपीएल २०२४आयपीएल लिलावदिल्ली कॅपिटल्स