Virat Kohli Ab De Villers , IND vs SA ( Marathi News ) : भारतीय संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० आणि वन डे असे दोन टप्पे पार पडले. टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर वन डे मालिका भारताने २-१ अशी जिंकली. आता या दौऱ्यातील शेवटचा टप्पा कसोटी मालिकेचा आहे. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तर दुसरा आणि अखेरचा सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. भारताच्या अनुभवी खेळाडूंना टी२० आणि वनडे साठी विश्रांती देण्यात आली होती. पण कसोटी मालिकेसाठी संघात अनुभवी खेळाडू दाखल होणार आहे. अशा परिस्थिती भारताचा रनमशिन विराट कोहलीला झटपट कसे बाद करावे, याची एक युक्ती दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने सांगितली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी संघ २६ तारखेपासून पहिली कसोटी खेळणार आहे. या सामन्यासाठी रोहितसह विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडू संघात परतणार आहेत. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची मदार विराट कोहलीवर असणार आहे. त्यामुळे विराट कोहलीला झटपट बाद केल्यास आफ्रिकेला फायदा होईल. अशा परिस्थितीत विराट कोहलीचा जिवलग मित्र एबी डिव्हिलियर्स याने विराटला बाद करण्याचा एक उपाय सांगितला आहे. विराटला चौथ्या स्टंपवर गोलंदाजी करूनच बाद करता येईल असे डिव्हिलियर्सचे म्हणणे आहे.
"विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. विराटसारख्या फलंदाजाला बाद करायचे असेल तर त्याचा एक सोपा पर्याय आहे. गोलंदाजाने विशेष काही करत बसण्याची गरज नाही. विराटला सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर चौथ्या स्टंपवर गोलंदाजी करत राहावी लागेल. एक क्षण असा येईल की विराट कोहली एखादा तरी चेंडू खेळायला जाईल आणि बॅटची एज लागून तो झेलबाद होईल," अशी युक्ती एबी डिव्हिलियर्सने सांगितले आहे. दरम्यान, विराट देखील याबाबत जाणून असल्याने त्यानेही यावर नक्कीच सराव केला असेल. अशा परिस्थितीत विराट विरूद्ध आफ्रिकन गोलंदाज हा सामना पाहणे रंगतदार असेल.