कोलंबो - अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. दिनेश कार्तिकने केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर भारताने निदाहास चषक पटकावला. शेवटच्या चेंडूवर षटकार कसा ठोकला ही राज की बात दिनेश कार्तिकने सामन्यानंतर सांगितली.
मी मैदानात गेलो त्यावेळी स्थिती खूपच तणावपूर्वक होती सामना बांगलादेशच्या बाजूने झूकला होता. पण मी माझ्या डोक्यात विजय भारताला विजय मिळवून द्यायाचा या विचारानेच मैदानावत गेलो होतो. डोकं शात ठेवून मी खेळायचे ठरवले. दररोज नेटमध्ये षटकार मारण्याच्या प्रॅक्टीसमुळंच मला शेवटच्या चेंडूवर षटकार मारता आल्याचे कार्तिकने स्पष्ट केलं. सौम्य सरकाने टाकलेला शेवटचा चेंडूची लाईन लेंथ मी आधीच ओळखली होती. त्यानं चेंडू टाकल्यानंतर मी पूर्ण ताकदीने बॅट फिरवली. नशिबाने साथ दिली आणि चेंडू सरळ सिमारेषेच्या बाहेर फेकला गेला.
कार्तिक फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताला विजयासाठी 12चेंडूत 34 करायच्या होत्या. आधीचच्या षटकामध्ये शंकरने चार चेंडू निर्धाव खेळल्यामुळं आणि मनिष पांडे बाद झाल्यामुळं संघावर दबाव वाढला होता. 19 व्या षटकात कार्तिकने दोन षटकारासह 22 धावा वसूल करत दबाव कमी केला होता.
अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरच्या तीन षटकात भारताला 35 धावांची गरज असताना युवा अष्टपैलू विजय शंकर दडपणाखाली ढेपाळला. यावेळी मुस्तफीझूर रहमानने टिच्चून मारा करत पहिले चार चेंडू निर्धाव टाकले, तर पाचव्या चेंडूवर विजयने लेगबायच्या जोरावर धाव घेतली. मात्र, अखेरच्या चेंडूवर स्थिरावलेला मनिष पांडे (28) बाद झाल्याने बांगलादेश मजबूत स्थितीत आला.
यावेळी, शंकरच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा पराभव नजीक दिसत होता. मात्र, खेळपट्टीवर आलेल्या अनुभवी दिनेश कार्तिकने 19व्या षटकात सर्व चित्रंच पालटले. त्याने रुबेल हुसैनच्या या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत एकूण 22 धावांची लयलूट केली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. अखेरच्या षटकात 12 धावांची गरज असताना शंकर पुन्हा एकदा चाचपडला, मात्र त्याने चौथ्या चेंडूवर एक चौकार मारला. पाचव्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात शंकर झेलबाद झाला, परंतु तोपर्यंत स्ट्राइक चेंज झाल्याने कार्तिक फलंदाजीला आला आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना त्याने षटकार ठोकत भारताचा थरारक विजय साकारला. रुबेलने दोन प्रमुख बळी भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले, मात्र कार्तिकने त्याच्या एका षटकात संपूर्ण सामना फिरवला. कार्तिकने आपल्या शानदार खेळीत दोन चौकार व तान षटकार खेचले.